कौशल्य विकासातून कोकणात रोजगार निर्मिती करणार!, प्रमोद जठार यांची माहिती
By सुधीर राणे | Published: December 17, 2022 04:32 PM2022-12-17T16:32:05+5:302022-12-17T16:33:43+5:30
कणकवली: बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांचे कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. ...
कणकवली: बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांचे कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आताच आयटीआय मधून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण केले पाहिजे. त्यासाठी २१०० गावांमधील प्रत्येक गावातील किमान ५० मुलांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली असून त्यादृष्टीने लवकरच मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी दिली.
कणकवली येथील भाजपा कार्यालयात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पप्पू पुजारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जठार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काळात बारसू रिफायनरी प्रकल्प भूसंपादन करण्यासाठी दर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी मी अनेक वर्षे काम करत आहे. कोकणातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी हा रिफायनरी प्रकल्प आवश्यक आहे. प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी या ठिकाणी मिळेल. त्यासाठी कौशल्य विकास(स्किल डेव्हलपेंट) विभागाच्यावतीने २१०० गावांमधील प्रत्येक गावातील किमान ५० मुलांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे. त्यांनी अधिवेशन संपल्यावर तातडीने बैठक लावू असे सांगितले आहे. या बैठकीला कोकणातील आमदार उपस्थित राहतील.
रिफायनरी प्रकल्प झाल्यास कोकणचा चेहरा मोहरा बदलून जाईल. येथील अर्थकारण बदलेल आणि नोकरीसाठी येथील तरुणांना मुंबई, पुण्यात जावे लागणार नाही. रिफायनरी प्रकल्पात इंजिनियर, फिटर, वायरमन अशा प्रशिक्षित लोकांची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याकडे कार्यरत असलेल्या आयटीआयमध्ये आवश्यक असे नवे ट्रेड सुरू करून येथील बेरोजगार तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे जठार यांनी सांगितले.