घोटगे बससेवेसाठी नियंत्रकांना घेराओ
By admin | Published: September 16, 2015 12:39 AM2015-09-16T00:39:28+5:302015-09-16T00:42:48+5:30
एकनाथ नाडकर्णींचे आश्वासन : मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा
कसई दोडामार्ग : घोटगे परमे सुरू झालेली एसटी बस बंद केल्याने मंगळवारी घोटगे ग्रामस्थांनी दोडामार्ग वाहतूक नियंत्रक यांना घेराओ घालून ही बस पूर्ववत सुरू ठेवा, अशी मागणी केली. तात्पुरती गणेश चतुर्थी सणाच्या कालावधीत न ठेवता कायमस्वरूपी ठेवा. अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. ही एसटी बस कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून प्रयत्न केले जातील, असे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले.
घोटगे परमे अशी दोडामार्ग येथून एसटी बस सुरू होती. ही बस फेरी पावसाळा सोडला तर इतर महिने सुरू ठेवण्यात आली होती. पावसाळ्यात उद्भवणारी समस्या म्हणजे घोटगे-परमे तिलारी नदीवर पक्का पूल नसल्याने ही बसफेरी पावसाळ्यात बंद ठेवली जायची. मात्र, गेल्यावर्षी दिवाळीनंतर पक्के पूल बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली, या पावसाळ््यात पुलाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे एसटी महामंडळाने ही बसफेरी पूर्ववत सुरू ठेवणे गरजेचे असताना, अद्यापपर्यंत ही बस सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना वाहतुकीच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. गणेश चतुर्थी सणापूर्वी ही बस फेरी सुरू करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. याबाबत बऱ्याच दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने तसेच प्रत्यक्ष भेटून ही मागणी केली होती. मात्र, एसटी महामंडळाने या मागणीकडे लक्ष दिला नाही. या कारणाने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला.
या मागणीकडे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनीही तसा पत्रव्यवहार संबंधित अधिकाऱ्यांना केला. त्याला प्रत्युत्तरही अधिकाऱ्यांनी नाडकर्णी यांना दिले. गणेश चतुर्थी सणाच्या कालावधीत ही बसफेरी सुरू ठेवतो, असे कळविले. हे ग्रामस्थांनी मान्य न करता कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याने मंगळवारी घोटगे ग्रामस्थांनी दोडामार्ग एसटी बस नियंत्रण कक्षाचे वाहतूक नियंत्रकांना घेराव घातला. ही बसफेरी अद्याप सुरू का करण्यात आली नाही, याचा जाब विचारला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी उपस्थित होते. रस्त्याच्या कडेला असलेली झाडी न तोडल्याने वाहतुकीला अडथळा येत असल्याने सुरू केली नाही, असे वाहतूक नियंत्रकांनी सांगताच ही झाडी तोडून कित्येक दिवस झाले. मात्र, ही बसफेरी का सुरू केली नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चर्चा केली. ही एसटी बस गणेश चतुर्थी सणाच्या कालावधीपुरती सुरू न ठेवता कायमस्वरूपी ठेवण्यात यावी. अन्यथा आम्हाला आक्रमक पावित्रा घ्यावा लागेल, असे ग्रामस्थांनी सांगितले. गणेश चतुर्थीनंतर ही एसटी बसफेरी कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसा प्रयत्न केला जाईल, असे जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ही बस कामयस्वरूपी सुरू ठेवणार, असे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामस्थ विठ्ठल दळवी, भरत दळवी, कानू दळवी, सतीश परब, शंकर दळवी, संजय दळवी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)