आंबोलीत स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण, ४८ तासांत झोपड्या काढण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 03:28 PM2020-08-17T15:28:46+5:302020-08-17T15:30:11+5:30
येत्या ४८ तासांत संबंधितांनी आपल्या झोपड्या काढून टाकाव्यात. अन्यथा प्रशासन पोलीस बंदोबस्तात त्या झोपड्या काढून टाकेल, असे लेखी आश्वासन दिल्याने वस्तीतील सुमारे पंचवीस ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.
सावंतवाडी : आंबोली जाधव वाडीतील स्मशानभूमीच्या जागेवर बाहेरील लोकांनी येऊन अतिक्रमण केले व त्याठिकाणी झोपड्या उभारल्या. त्या झोपड्यांना ग्रामपंचायतीने घर नंबर दिले. याबाबत दलित वस्तीतील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले. अखेर प्रांताधिकारी खांडेकर यांनी येत्या ४८ तासांत संबंधितांनी आपल्या झोपड्या काढून टाकाव्यात. अन्यथा प्रशासन पोलीस बंदोबस्तात त्या झोपड्या काढून टाकेल, असे लेखी आश्वासन दिल्याने वस्तीतील सुमारे पंचवीस ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.
आंबोली हिरण्यकेशीजवळील हरिजनवस्तीच्या राखीव स्मशानभूमीच्या जागेवर काही बाहेरील व्यक्तींनी अनधिकृतपणे सिमेंटच्या मेढी उभारून पत्रे घालून त्यांना ग्रामपंचायतीकडून नंबर घेतले होते.
ही जागा शासन दरबारी नोंद असताना अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणाऱ्या ग्रामपंचायतीवर व झोपड्या बांधणाऱ्या संबंधितांवर कारवाई करून आपली जागा खाली करून मिळावी यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी उपोषण छेडले होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सगुण जाधव, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव, दशरथ जाधव, गोविंद जाधव, अनंत जाधव, प्रकाश जाधव, केशव जाधव, मनोहर जाधव, पांडुरंग जाधव, बाळकृष्ण जाधव, अजय जाधव, एकनाथ जाधव, विश्राम जाधव, यशवंत जाधव, योगेश जाधव, पार्वती जाधव, जगन्नाथ जाधव, प्रसाद जाधव, शशिकांत जाधव, भरत जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी ४८ तासांच्या मुदतीत संबंधित ठिकाणी जेसीबी लावून जागा ताब्यात देण्यात येईल. संबंधित व्यक्ती व ग्रामपंचायत यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी वंचित बहुजनचे महेश परुळेकर यांनी ग्रामपंचायतीवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. कारवाई न झाल्यास सोमवारी आपण त्या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले. कारवाई का करण्यात आली नाही? असे विचारले.