जंगली हत्तींची लोकवस्तीत घुसखोरी, फळबागायतींचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 01:45 PM2024-01-20T13:45:08+5:302024-01-20T13:45:35+5:30

काजू बागेत जाणेदेखील बनले मुश्कील

Encroachment of wild elephants into human settlements, damage to orchards; An atmosphere of fear among farmers | जंगली हत्तींची लोकवस्तीत घुसखोरी, फळबागायतींचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

जंगली हत्तींची लोकवस्तीत घुसखोरी, फळबागायतींचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

दोडामार्ग : विजघर बांबर्डे परिसरात वावर असलेला टस्कर व त्याचे पिल्लू आता थेट लोकवस्तीत घुसत असल्याने शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. दिवसाढवळ्या फिरणाऱ्या या हत्तींमुळे जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ लोकांवर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा टस्कर पिल्लासह लोकवस्तीत घुसला. त्यामुळे लोकांची अक्षरशः दाणादाण उडाली आणि पळापळ सुरू झाली. कधी हत्ती आक्रमक तर कधी ग्रामस्थ त्याच्या आक्रमकपणावर भारी पडत होते. हा थरार जवळपास दीड तास सुरू होता. अखेर अथक प्रयत्नांनंतर टस्कराला पिल्लासहित जंगलात हुसकावून लावण्यात ग्रामस्थांना यश आले आणि जीवन-मृत्यूच्या संघर्षात काही काळापुरता का होईना, लोकांचा विजय झाला.

बांबर्डे, घाटीवडे परिसरात दाखल झालेल्या टस्कर व हत्तीच्या पिल्लाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपूर्वी या हत्तींनी आपला मोर्चा तेरवण-मेढे, मोर्ले, घोटगेवाडी गावाकडे वळविला होता. तेथील केळी, नारळ, सुपारी, काजू बागायतींचे अतोनात नुकसान केले. त्यानंतर पाळये येथे जात तेथेही फळबागायतींचे नुकसान केले. हे हत्ती पुन्हा बांबर्डे परिसरात दाखल झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६:३० वा.च्या सुमारास टस्कर व पिल्लू लोकवस्ती शेजारी असलेल्या फळबागयतीत घुसले. यावेळी टस्कर एका भल्या मोठ्या माडाला सोंडेने जमीनदोस्त करण्याच्या प्रयत्नात होता.

यादरम्यान हत्ती लोकवस्तीत आल्याचे समजताच आरडाओरड आणि पळापळ सुरू झाली. आक्रमक रूप धारण केलेल्या हत्तींना जंगलात हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नात कधी हत्ती आक्रमक तर त्याच्या आक्रमकतेवर कधी जिवाच्या आकांताने त्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करणारे लोक भारी पडत होते. हा थरार साधारणतः दीड तास चालला आणि अखेर शेतकऱ्यांचा विजय झाला.

काजू बागेत जाणेदेखील बनले मुश्कील

सध्या काजूचा हंगाम असल्याने व हत्ती दिवसाढवळ्या फळ बागायतीत येत असल्याने बागायतीत जावे की नाही, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाण मांडून उभा आहे. कारण, टस्करासोबत एक पिल्लू आहे. तसेच भल्या मोठ्या टस्कराचे सुळे अतिशय लांब आहेत. बागायतीत घुसलेल्या या हत्तींना हुसकावताना पिल्लाच्या संरक्षणार्थ टस्कर चाल करून येत आहे. त्यामुळे या हत्तींना पिटाळून लावणे जोखमीचे आहे. हत्तींचा वावर आता वाढत चालला असून, वनविभागाने या हत्तींना पिटाळून लावावे व आम्हाला भयमुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.

Web Title: Encroachment of wild elephants into human settlements, damage to orchards; An atmosphere of fear among farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.