स्मार्टफोनचे अतिक्रमण
By admin | Published: June 15, 2014 12:29 AM2014-06-15T00:29:30+5:302014-06-15T00:30:44+5:30
सायबर कॅफेंना कुलूप : महसूल करामुळे मालक अडचणीत
प्रसन्न राणे ल्ल सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मार्टफोनचे अतिक्रमण वाढल्याने ५० टक्के सायबर कॅफेंना कुलूप लागले आहेत. कॅफे बंद असूनही शासनाचा महसूल कर भरावा लागत आहे. मात्र, आता या करातही वाढ होणार असल्याने सायबर कॅफेचे मालक अडचणीत येणार आहेत.
सध्या सायबरच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे कॅफेत येणाऱ्या ग्राहकांकडून ओळखपत्र आणि त्याचा पत्ता सक्तीने घ्यावा लागत आहे. याचे सावंतवाडीत प्रमाण नगण्य असले तरी स्मार्ट फोनच्या सर्रास वापरामुळे सायबर कॅॅफेंना फटका बसत आहे. एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५० टक्के कॅफे बंद झाले असून भविष्यात सायबर कॅफे सुरू राहतील का? याबाबत शंका निर्माण झाली आहे.
जगातील बहुतेक व्यवहार आता इंटरनेटच्या माध्यमातूनच होत असल्याने जग जवळ आले आहे. पूर्वी इंटरनेट कॅफेंची संख्या मर्यादितच होती. मात्र, स्मार्टफोनच्या वापरामुळे इंटरनेट आता तरुणाईसह सर्वांच्याच मुठीत आले आहे. कमीत कमी दरात वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन मिळत असल्याने आता सामान्य जनतेमध्येही स्मार्टफोनचे फॅड पसरू लागले आहे. यासाठी लागणारे रिचार्जही सुलभरित्या उपलब्ध होत असल्याने तरुणाई तर चोवीस तास इंटरनेटमध्ये गुंतल्याचे दिसून येत आहे.
यामुळे सायबर कॅफेकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. तसेच घरोघरी संगणक, लॅपटॉप आल्याने आता सायबर कॅफेमध्ये जाण्याची गरजही तशी उरलेली नाही. काही वर्षांपूर्वी सायबर कॅफेसाठी ग्राहकांची गर्दी व्हायची. आता मात्र हे कॅफे बकाल होत चालले आहेत.
घरातच इंटरनेटवर काम करून केवळ प्रिंट मारण्यापुरता सायबर कॅफेचा मर्यादित वापर होऊ लागला आहे. इंटरनेटसह रिचार्ज, झेरॉक्स, टीव्ही रिचार्ज आदी सुविधा उपलब्ध असलेले काही कॅफे तग धरून असल्याचे दिसून येत आहे. सायबर कॅफे सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयीन करमणूक शाखेची परवानगी घ्यावी लागते. त्याबरोबरच जागेचे भाडे सुमारे ५ हजार रुपये, एक संगणक २५ हजार रुपये (असे किमान पाच संगणक), तसेच कॅफेची सजावट आदीसाठी सुमारे दीड लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते.
शिवाय प्रिंटर, स्कॅनर, लाईट बिल, सर्व्हिसिंग आदींचा खर्च वेगळाच. एवढे सर्व करूनही सर्फिंगचा दर मात्र तासाला केवळ २० रुपये मिळत असल्याने सायबर कॅफे चालविणे कठीण होऊन बसले आहे. तर काही ठिकाणी याचा वापर केवळ व्हिडीओ गेम्ससाठी केला जात आहे. परंतु आता संगणक, लॅपटॉप आणि स्मार्ट फोनवरही विविध प्रकारचे गेम्स उपलब्ध असल्याने मुलांनी सायबर कॅफेकडे पाठ फिरविलेली दिसत आहे.