Politics : हा तर नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 07:48 PM2021-05-24T19:48:51+5:302021-05-24T19:51:40+5:30
Politics Sindhudurg : महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवायची आता आपल्या वडिलांची राजकीय कुवत राहिलेली नसल्यामुळे ते या सर्वोच्च पदासाठी पात्र नाहीत आणि भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपद भूषविण्यासाठी नारायण राणेंपेक्षा कितीतरी पटीने सरस व सक्षम आहेत, अशी प्रांजळ कबुलीच नीतेश राणेंनी दिल्याचा टोला शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी लगावला आहे.
कणकवली : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो ते बघा. असे वक्तव्य आमदार नीतेश राणेंनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी लावलेला पूर्णविराम आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवायची आता आपल्या वडिलांची राजकीय कुवत राहिलेली नसल्यामुळे ते या सर्वोच्च पदासाठी पात्र नाहीत आणि भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपद भूषविण्यासाठी नारायण राणेंपेक्षा कितीतरी पटीने सरस व सक्षम आहेत, अशी प्रांजळ कबुलीच नीतेश राणेंनी दिल्याचा टोला शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी लगावला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चक्रीवादळाच्या नुकसानीनंतर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीरांप्रमाणे दौऱ्यावर कोणतीही वल्गना केलेली नाही. नुकसान झालेल्याचा पूर्ण डाटा घेऊन योग्य प्रकारे भरपाईची घोषणा ते लवकरच करतील.
मात्र, हे करतानाच भविष्यात येणाऱ्या वादळांबाबत उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला आहे. समुद्र किनारपट्टी भागात अंडरग्राऊंड केबल, धूप प्रतिबंधक बंधारे यासारख्या उपाययोजना तातडीने करण्याच्या अनुषंगाने त्यांनी पावले उचलली आहेत. दूरदृष्टी असलेला नेता कसा असावा, याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे ज्या कोकणवर शिवसेनाप्रमुखांचे प्रेम होते त्याच कोकणवर मुख्यमंत्र्यांचेही किती प्रेम आहे, ते लवकरच दाखवून देतील आणि नुकसानग्रस्तांचे अश्रूही पुसतील, यात कुणालाही शंका घेण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
आज देशात सर्वाधिक जीएसटी देणारे राज्य हे महाराष्ट्र असताना येथे झालेल्या नुकसानीबाबत राज्याला झुकते माप देण्याची अपेक्षा होती. मात्र, याही ठिकाणी पंतप्रधानांनी राजकारण केले. हे राजकारण वैफल्यग्रस्त झालेल्यांच्या डोळ्यांना दिसत नाही का? असा सवालही अतुल रावराणे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत ही हवेत गोळीबार करण्याची नाही, तर ते घोषणा करतात आणि ते काम तत्काळ पूर्ण करतात. त्याच पद्धतीचे काम चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईबाबतही ते करतील. मात्र, जिल्हा दौऱ्यावर आलेल्या व मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने वैफल्यग्रस्त झालेले देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारच्या माध्यमातून वादळ ग्रस्तांसाठी काहीतरी घोषणा करतील, अशी अपेक्षा त्यांच्या नेत्यांना होती. मात्र, त्यांनी जनतेची नाही तर त्यांच्या नेत्यांचीच निराशा केली.
पंतप्रधानांनी गुजरातसाठी १ हजार कोटी दिले त्याबद्दल आम्ही अभिनंदनच करतो. मात्र, हे करत असताना महाराष्ट्राबाबत सापत्नभावाची वागणूक दाखविल्याचा निषेधही करतो, असे रावराणे यांनी म्हटले आहे.