‘परवानगी’चे दुष्टचक्र संपेना
By admin | Published: March 18, 2016 09:16 PM2016-03-18T21:16:59+5:302016-03-18T23:57:57+5:30
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : तालुका, जिल्हा संघटनांकडून असहकार्य
मालवण : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यासाठी राज्य संघटनेने तालुका आणि जिल्हा असोसिएशनची मान्यता घेण्याचा फतवा काढला आहे. मालवणातील कबड्डीपटू आणि रसिकांच्या मागणीखातर आमदार वैभव नाईक कुडाळनंतर मालवणात ही राज्य कबड्डी स्पर्धा घेण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी राज्य संघटनेकडे रीतसर परवानगीही घेण्याचा अर्ज केला आहे. तसेच तालुुका व जिल्हा संघटनांकडे गेले कित्येक दिवस परवानगी मागूनही त्यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याने ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आमदार वैभव नाईक यांनी घेतला आहे.
दरम्यान, या प्रकरणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जिल्हा व तालुका कबड्डी संघटनांकडून सहकार्य मिळत नसेल आणि त्यांनाच स्थानिक खेळाडू पुढे यावेत असे वाटत नसतील तर स्पर्धा कशासाठी घ्यायच्या? एक स्पर्धा घेण्यासाठी सुमारे पाच ते सात लाख रुपये खर्च अपेक्षित असताना नुसती परवानगी देण्यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता ही स्पर्धा रद्द करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचलो असल्याचे स्पष्ट केले.
कुडाळ येथे घेतलेल्या राज्यस्तरीय डे-नाईट कबड्डी स्पर्धेतील अभूतपूर्व यशानंतर मालवणातील अनेक गुणवंत खेळाडूंनी ही स्पर्धा मालवणात होण्यासाठी आमदार नाईक यांची भेट घेतली होती. यात महेश गिरकर, मंदार ओरसकर, विराज पाटकर तसेच इतरही ज्येष्ठ आणि युवा खेळाडूंचा समावेश होता. आमदारांनी स्पर्धा घेण्याचेही आश्वासन दिले होते. त्यानुसार स्पर्धा घेण्याचे वेळापत्रकही ठरविले. तालुका, जिल्हा संघटनांच्या मान्यतेसाठी रीतसर अर्ज करीत संपर्कही साधला. मात्र, याबाबतची परवानगी देण्यात आलेली नसल्याचे नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
खेळाडूंनीच निर्णय घ्यावा : आमदार वैभव नाईक
ंकुडाळमधील राज्य स्पर्धेत जिल्ह्यातील दोन संघ सहभागी करून घेण्यात आले होते. यामुळे या दोन संघांतील खेळाडूंना एक चांगला अनुभव घेता आलेला आहे. मालवणातीलही खेळाडूंना अशाप्रकारे राज्यस्तरीय खेळाडूंशी स्पर्धा करण्याचा अनुभव मिळण्यासाठी आपला प्रयत्न होता. मात्र, त्यात संघटनांचे सहकार्य मिळत नसल्याने आपण नाराज बनलो आहे. यामुळे खेळाडूंनीच तालुकाध्यक्ष बाबला पिंटो आणि जिल्हाध्यक्ष दिनेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याबाबतची विचारणा करावी. ही स्पर्धा २३, २४ व २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार होती, असेही आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.