नायब तहसीलदारांना ग्रामस्थांचा घेराओ
By admin | Published: April 10, 2015 11:09 PM2015-04-10T23:09:00+5:302015-04-10T23:46:05+5:30
इन्सुली येथील घटना : क्वॉरीवर कारवाईस नकार
बांदा : गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपरवर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारणारे सावंतवाडीचे निवासी नायब तहसीलदार शशिकांत जाधव व बांदा मंडळ अधिकारी एम. आर. जाधव यांच्या विरोधात संतप्त ग्रामस्थ व डंपर व्यावसायिकांनी इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर घेराओ घालत नाराजी व्यक्त केली. वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा महसूलच्या आशीर्वादाने इन्सुली परिसरात सुरु असलेल्या बेकायेदशीर क्वॉरी बंद करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली. मात्र, तहसिलदारांनी प्रथम अर्ज द्या नंतर कारवाई करतो असे सांगितल्याने व्यावसायिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी डंपर व्यावसायिक व नायब तहसिलदार शशिकांत जाधव, एम. आर. जाधव यांच्यात बाचाबाचीचे प्रकार घडलेत. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. यावेळी पोलिस उपनिरिक्षक सुधाकर आरोलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वेळीच हस्तक्षेप केला. यावेळी महसूलच्या अधिकाऱ्यांचे क्वॉरी मालकांशी आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला. महसूलच्या पथकाकडून जिल्ह्यातून गोव्यात गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. यासाठी महसूलकडून दिवसा व रात्र इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर या वाहनांवर करडी नजर ठेवण्यात येते.
शुक्रवारी सकाळी बांदा मंडळ अधिकारी एम. आर. जाधव, बांदा तलाठी एस. व्ही. नलावडे, डेगवे तलाठी किरण गझीनकर, असनिये तलाठी एस. बी. शिंदे यांचे पथक इन्सुली तपासणी नाक्यावर कार्यरत होते. जिल्ह्यातून गोव्याच्या दिशेने गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर वाहतूक परवाना संपल्याचे कारण देत दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, चालकांनी पैसे भरण्यास नकार दिला. वाहनांवर केलेली दंडात्मक कारवाई ही बेकायदेशीर असल्याचे सांगत डंपर व्यावसायिकांनी मंडळ अधिकारी एम. आर. जाधव यांना घेराओ घालून जाब विचारला.
आपण केवळ वाहनांवर कारवाई करता, बांदा मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात कित्येक गावांत बेकायदा क्वॉरी सुरु असून या क्वॉरी मालकांशी मंडळ अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्यानेच त्यांचेवर कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप केला.
यादरम्यान गोवा पासिंगच्या गाड्या न थांबविता जाऊ देण्यात आल्याने व्यावसायिकांनी आक्षेप घेतल्या. तसेच रात्रीच्या वेळी सुमारे १५0 वाळूच्या बेकायदा गाड्या गोव्यात पास करण्यात येतात, यामध्ये महसूलच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी सुशांत पांगम, गजानन गायतोंडे, तात्या वेंगुर्लेकर, संतोष धुरी, नीतेश पेडणेकर, साई राणे, गुंडु झांट्ये, सत्यवान कुडव, भाऊ नाटेकर यांचेसह डंपर व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
व्यावसायिकांनी जाब विचारला
सावंतवाडीचे नायब तहसीलदार शशिकांत जाधव यांनी इन्सुली तपासणी नाक्यावर येत मंडळ अधिकारी एम. आर. जाधव यांच्याशी कारवाई संदर्भात चर्चा केली. त्यावेळी डंपर व्यावसायिकांनी इन्सुली, वेत्ये परिसरात सुरु असलेल्या बेकायदा क्वॉरी बंद करण्याची मागणी केली. आपण स्वत: बेकायदा सुरु असलेल्या क्वॉरी दाखवतो, आपण आमच्यासोबत चला. मात्र तहसीलदार जाधव यांनी आम्ही याठिकाणी केवळ बेकायदा वाहनांवर कारवाईसाठी आलो आहोत. आपण या क्वॉरींसदंर्भात सावंतवाडी कार्यालयात रितसर अर्ज द्या, नंतर कारवाईचे बघू, असे सांगितल्याने संतप्त व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त करत तहसीलदार यांना जाब विचारला.