सिंधुदुर्गात अंबानी, अदानींसारखे उद्योजक व्हावेत; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केली इच्छा

By सुधीर राणे | Published: January 7, 2023 06:53 PM2023-01-07T18:53:07+5:302023-01-07T19:20:48+5:30

कणकवली: माझ्या मंत्री पदाचा उपयोग कोकणवासीयांना व्हावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत. जिल्ह्यात अंबानी, अदानी यांच्यासारखे उद्योजक व्हावेत. श्रीमंतांच्या नावाच्या यादीत ...

Entrepreneurs like Ambani, Adani should become in Sindhudurga, Desire of Union Minister Narayan Rane | सिंधुदुर्गात अंबानी, अदानींसारखे उद्योजक व्हावेत; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केली इच्छा

सिंधुदुर्गात अंबानी, अदानींसारखे उद्योजक व्हावेत; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केली इच्छा

googlenewsNext

कणकवली: माझ्या मंत्री पदाचा उपयोग कोकणवासीयांना व्हावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत. जिल्ह्यात अंबानी, अदानी यांच्यासारखे उद्योजक व्हावेत. श्रीमंतांच्या नावाच्या यादीत कोकणवासीय उद्योजकही असावा, असे आपले स्वप्न आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याची प्रगती साधता येईल. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे केले. 

समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रोटरी क्लबचे गोवा येथील पदाधिकारी गौरेश धोंड, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत आदी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न १९९० साली केवळ ३५ हजार होते. ते आजघडीला सव्वादोन लाख झाले आहे. ही प्रगती असली, तरी नजीकच्या गोवा राज्याचे दरडोई उत्पन्न साडेचार लाख रुपये असून ते पर्यटनाच्या माध्यमातून झाले आहे. अशीच प्रगती आपल्याला करायची आहे. जिल्हावासीयांना बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात, उद्योगधंद्यांचे ज्ञान मिळावे, यासाठी सिंधुदुर्गासह मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये मी सिंधु महोत्सव सुरु केले. आता नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांचे सहकारी कणकवली पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगाराची संधी देत आहेत. हे  कौतुकास्पद आहे. 

माझ्या लघु, सुक्ष्म, मध्यम उद्योग मंत्रालयाचा देशाच्या निर्यातीमध्ये ५० टक्के वाटा आहे. तर जीडीपीमध्ये ३० टक्के वाटा आहे. यामध्येही येत्या काळात अमुलाग्र बदल होणार आहेत. वास्तविक चांगल्याला वाईट म्हणणे ही विकृती आहे. पण, नितेश राणे, समीर नलावडे व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी कुणाच्या टिकेकडे लक्ष न देता काम करीत रहावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात चांगले काम करीत आहेत. त्यांच्या मंत्रीमंडळात रवींद्र चव्हाण यांचाही सहभाग आहे. पालकमंत्री व केंद्रीयमंत्री असे आम्ही दोघे एकाच जिल्ह्याचे सुपुत्र आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. 

मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, नारायण राणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा घोषित झाला. त्यानंतरच्या काळात सातत्याने पर्यटनाला चालना देण्याचे काम राणेंच्या माध्यमातून झाले. त्यात गुंतवणूक व दरडोई उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काही नवीन करू इच्छिणाऱ्या तरुणांना संधी असून शेतीपूरक व्यवसाय यावेत, कोकणातील स्थलांतर थांबावे व त्यांना कोकणातच रोजगार मिळावा, असा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न आहे.

पर्यटनाच्या माध्यमातून कलागुणांना वाव देण्याचे काम होते. कारण, येथील खेळ, कलांना संधी, कला संस्कृती जपणे ही देखील काळाची गरज आहे. त्यामुळे कणकवली पर्यटन महोत्सव कौतुकास्पद आहे.

समीर नलावडे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, जिल्ह्यात सर्वप्रथम नारायण राणेंनी सिंधु महोत्सव सुरू केला. जिल्हा पर्यटनदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी राणेंनी प्रयत्न केला. त्यापासूनच प्रेरणा घेऊन आम्ही कणकवली पर्यटन महोत्सव आयोजित करीत आहोत. शहरातील तरुणपिढीला विधायक मार्गाकडे वळविण्याचे आमचे प्रयत्न आहेत. 

यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्यात आला. यामध्ये  इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे, अरुण जोगळे, उत्तम पुजारे, निनाद पारकर, अमित टकले, डॉ.सुहास पावसकर, डॉ.संजय पोळ, परिचारिका नयना मुसळे, आरोग्य विभागातील प्रशांत बुचडे, विशाल मेस्त्री, अणाव येथील सविंता आश्रमाचे संदीप परब यांचा समावेश होता. 

Web Title: Entrepreneurs like Ambani, Adani should become in Sindhudurga, Desire of Union Minister Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.