हिंदू धर्मावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याचा भाजपात प्रवेश; उद्धवसेनेच्या सुशांत नाईकांची मंत्री नितेश राणेंवर टीका, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 17:37 IST2025-03-04T17:35:46+5:302025-03-04T17:37:03+5:30
कणकवली : पालक मंत्री नितेश राणे यांनी आमदार म्हणून निवडून आल्यावर मुस्लिमांची मते मला नको, मी फक्त हिंदूंच्या मतांवर ...

हिंदू धर्मावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याचा भाजपात प्रवेश; उद्धवसेनेच्या सुशांत नाईकांची मंत्री नितेश राणेंवर टीका, म्हणाले..
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी आमदार म्हणून निवडून आल्यावर मुस्लिमांची मते मला नको, मी फक्त हिंदूंच्या मतांवर निवडून आलो, असे वक्तव्य केले होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी कणकवली तालुक्यातील उद्धवसेनेतील मुस्लीमबांधवांचा प्रवेश घेतला. पण यातील सगळेच कार्यकर्ते हे उद्धवसेनेचे नव्हते. याउलट एक वर्षापूर्वी हिंदू धर्मावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे पालकमंत्र्यांचे हिंदुत्व हे बेगडी असून, जिल्ह्यातील जनता ते जाणून असल्याची टीका उद्धवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
हिंदू धर्मावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या त्या व्यक्तीला त्यावेळी त्यांच्याच गावच्या नागरिकांनी बेदम चोप दिला होता. उद्धवसेनेकडून त्या व्यक्तीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला होता व पक्षाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कणकवली पोलिस ठाण्यात त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिंदू धर्मावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला नितेश राणे यांनी पक्षात सामावून घेतले आहे. या आधी आरएसएसवर टीका करणारे आज हिंदुत्वावर प्रेम दाखवत आहेत. त्यांचा हा फक्त मंत्रिपदासाठी केलेला अट्टाहास होता, असेही नाईक यांनी म्हटले आहे.
त्यांचे हे हिंदुत्व आरएसएसला आता चालते काय? पालकमंत्री राणे हे आरएसएसला खुश करण्यासाठी हिंदुत्वाची शिकवण देत होते, पण आता मंत्री पद मिळाल्यानंतर हिंदुत्व बाजूला पडले आहे व मुस्लीम बांधवांचा मतांसाठी ते प्रवेश घेत आहेत. आतापर्यंत नितेश राणे यांनी घेतलेल्या प्रवेशात २० टक्के प्रवेश मुस्लीम बांधवांचे आहेत, असेही सुशांत नाईक यांनी म्हटले आहे.