विकास आघाडीचा ‘स्वाभिमान’मध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:21 AM2018-04-30T00:21:54+5:302018-04-30T00:21:54+5:30
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढविलेल्या कणकवली विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. यावेळी स्वाभिमानचे संस्थापक खासदार नारायण राणे उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कणकवली विकास आघाडीने स्वतंत्र पॅनेल केले होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विरोधात या आघाडीने निवडणूक लढविली होती. थेट नगराध्यक्ष पदासाठी राकेश राणे यांनी या आघाडीच्यावतीने निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना ११०० मते मिळाली
होती. नगराध्यक्ष पदासह आठ नगरसेवक या कणकवली विकास आघाडीने निवडणुकीत उभे केले होते.
आमदार नीतेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी कणकवली विकास आघाडी स्वाभिमान पक्षात विसर्जित करण्यात आली.
खासदार नारायण राणे यांच्या ओम गणेश या निवासस्थानी कणकवली विकास आघाडीच्या पदाधिकाºयांनी कार्यकर्त्यांसह स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. यावेळी स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, नूतन नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते. कणकवली विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राकेश राणे यांच्यासह मनोहर राणे, अंबाजी राणे, संजना सदडेकर, सखाराम राणे, श्रीकृष्ण राणे, मोमीन शेख, श्रीकृष्ण निकम, संतोष पिळणकर, मंगेश घाडीगांवकर, उमेश बुचडे, मंदार सावंत, अक्षय घाडीगांवकर, विजय राणे, सत्यवान राणे, अनंत राणे, गुरुदास राणे आदी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, कणकवली विकास आघाडी ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात विसर्जित झाल्यामुळे कणकवली शहरातील राजकारणात बदल होणार आहे.