पर्यावरणास पूरक बांधकामे हवी
By Admin | Published: July 8, 2014 10:56 PM2014-07-08T22:56:42+5:302014-07-08T23:17:49+5:30
वृक्ष संवर्धनाची गरज : रो हाऊस प्रकल्पांसाठी जंगलांची बेसुमार तोड
रामचंद्र कुडाळकर- तळवडे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. या जिल्ह्यात मोठमोठे रो हाऊस बंगले, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट उभे होत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. त्यामुळे प्रोजेक्टचे, रो हाऊसचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा त्या ठिकाणी पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने वृक्षांची लागवड करणे महत्त्वाचे आहे. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने कोकणात पायाभूत सुविधा असणाऱ्या बंगल्यांचे बांधकाम केल्यास जिल्ह्यातील आरोग्यजीवन नक्कीच आनंदी राहील.
भारतात २३ टक्के जमीन शेतीखाली आहे व इतर पडीक आहे. म्हणून जर स्वस्त घरे कोकणात उपलब्ध करायची असल्यास त्याची तशी रचना व पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे. आज एखादे बांधकाम करावयाचे असल्यास पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. पक्के डांबरी रस्ते व त्यावरील दिवाबत्ती, मुबलक
वीज प्रकल्प उभारण्यास तत्काळ
मंजुरी मिळणे, ग्रामीण भागातील प्रकल्पास प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.
स्टॅम्प ड्युटी- शहरी भागापेक्षा निम्मी स्टॅम्प ड्युटी आवश्यक आहे. ग्रामीण भागातील दर पूर्वी होता तो कायम करणे म्हणजे मोकळ्या पडीक जागेत जास्तीत जास्त प्रकल्प होतील. आज मुंबईसारख्या शहरात १ चौरस फूट जागेवरच १३ लोक राहतात. म्हणजेच लोकांची घनता विनाशक आहे. जर बुलेट ट्रेनसारखा प्रोजेक्ट सिंंधुदुर्गात सुरू झाल्यास लोक कोकणातून एका तासात मुंबईला जाऊ शकतील. शहरात बांधकाम व्यवसायात भरपूर नफा आहे. आयकराचे नियम शहरी भाग व ग्रामीण भाग असे भिन्न असले पाहिजेत. बांधकाम इन्कम टॅक्स व वेट ट्रॅक्स व सेवा कर ग्रामीण भागासाठी वेगळा लावावा. पर्यटन जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक करायचा असेल, तर या सर्व बाबींचा विचार व्हायला हवा. बांधकाम व्यवसाय ग्रामीण भागात वाढला तर शहरावरचा ताण कमी होईल व आपोआप पडीक जमिनीचा विकास होईल.
जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत विहिरींना आडवे बोअर मारून दिल्यास येथील शेतकरी बारमाही शेती करेल. सद्यस्थितीत आजारपणाचे प्रमाण वाढले आहे. आज प्रत्येक माणूस दिवसातून २१,६०० वेळा श्वास घेतो. २.६ ते २.८ किलोग्रॅम प्राणवायू स्वत:साठी वापरतो. ज्याचे आजचे बाजारमूल्य २१,००० आहे. म्हणजेच जर आपल्याला दररोज २१००० रुपयांचा प्राणवायू लागत असेल, तर तो निसर्गाला परत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
शालेय जीवनात प्रशालेत पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार झाडे लावण्यास सांगणे, त्यांची देखरेख करण्यास सांगणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासूनच त्यांच्यावर असे संस्कार झाले पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्याबाबत गुणात्मक प्रोत्साहन देणे आवश्यक आहे तसेच विदेशी झाडे (उदा. मन्जीयम, रेनट्री, नीलगिरी, सुबामुळ, ग्लिरिसीरिडिया, कासमास, सिल्व्हर ओक, काशीद आदी) लावण्यापासून परावृत्त करणे महत्त्वाचे आहे. स्थानिक झाडे प्रत्येकाने लावली पाहिजेत. वड, जांभूळ, निम, शिसम अशा विविध झाडांची लागवड करण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.