दोडामार्गात हत्तींचा धुडगूस; पिकांचे नुकसान
By admin | Published: November 3, 2016 11:34 PM2016-11-03T23:34:05+5:302016-11-03T23:34:05+5:30
बळिराजा धास्तावला : शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
दोडामार्ग : गेले काही दिवस गायब असलेले वन्य हत्ती पुन्हा एकदा तालुक्यातील हेवाळे-बांबर्डे गावात दाखल झाले असून, भातपिकाची उडवी व कापणी केलेले भातपीक फस्त केले आहे. भातपिकाचा हंगाम ऐन बहरात आला असतानाच हत्ती पुन्हा दाखल झाल्याने बळिराजा धास्तावला आहे. संपूर्ण हेवाळे, बाबरवाडी, घाटवाडी, बांबर्डे येथील शेतकरी कमालीचे हवालदिल झाले असून, ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा दाखल झालेल्या हत्तींच्या कळपाने भातपिकाबरोबरच केळी, सुपारी, माड, आदी बागायतींचे अतोनात नुकसान केले. वनखात्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तसेच पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांचे सातत्याने लक्ष वेधूनही गेले वर्षभर हेवाळे-बाबरवाडी परिसरात नुकसान करणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही.
बांबर्डे व घाटवाडी येथील शेतकरी गोविंद बाबली गवस यांचे भात व केळी, विठ्ठल राणे यांची भात उडवी, अश्विनी आबासाहेब देसाई यांचे भात, वसंत सखाराम देसाई यांची केळी बागायत, विठ्ठल दत्ताराम देसाई यांच्या केळी व सुपारी बाग, भीमराव राणे यांचे केळी व भातपीक, सिद्धेश राणे यांच्या केळी बागायतीचे नुकसान केले आहे.
चंदगड तालुक्यातून गेल गॅस पाईपलाईनसाठी काढलेल्या मार्गाने बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास दोन हत्ती खाली उतरले. त्यांनी बांबर्डे व घाटीवडे येथील शेतकऱ्यांचे शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. बुधवारी रात्री दाखल झालेल्या हत्तींनी केलेले नुकसान पाहता शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
दरम्यान, वनपाल दत्ताराम देसाई यांनी वनरक्षक मुकाडे, लोकरे व वनमजूर देसाई यांच्यासमवेत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला आहे, तर रात्री आलेले हत्ती आल्या मार्गाने पुन्हा माघारी परतल्याचा दावा करण्यात आला. मात्र, खबरदारी म्हणून गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून आपली हत्ती प्रतिबंधक टीम बांबर्डे येथे ठेवणार असल्याची माहिती वनपाल देसाई यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)