संगणक शिक्षणात दुर्लक्षाची ‘एरर’
By admin | Published: January 18, 2016 11:55 PM2016-01-18T23:55:21+5:302016-01-18T23:57:57+5:30
जिल्हा परिषद : एकीकडे ‘डिजिटल’साठी धडपड दुसरीकडे...
रहिम दलाल -- रत्नागिरी
एका बाजूला डिजिटल स्कूलसाठी प्रयत्न केले जात असतानाच जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शाळांमध्ये संगणक असूनही विद्यार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण दिले जात नसल्याने ते धूळखात पडले आहेत. असे शेकडो संगणक प्राथमिक शाळांमध्ये बंद पडलेले असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी अनुदान नसल्याने ते धूळखात पडले आहेत.
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळाल्यास भविष्यात त्यांना त्याचा फायदा होणार आहे. यासाठी शिक्षकांनी एमएस-सीआयटी कोर्स पूर्ण करण्याची सक्ती शासनाकडून करण्यात आली. तरीही आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील अनेक शिक्षकांनी संगणकासाठी आवश्यक असलेले प्राथमिक स्तरावरील एमएस-सीआयटी प्रशिक्षण घेतलेले नाही.
सध्याचे युग संगणकीय युग असल्याने विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी शासनाने प्राथमिक शाळांमध्ये संगणकाचे धडे देण्यास सुरुवात केली. बँकांचे व्यवहार, शासकीय कामकाजामध्ये संगणकाचा वापर तसेच खासगी कंपन्यांमधील कामकाजही संगणकाद्वारे केले जात असल्याने आता संगणक वापर आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनाही संगणकीय प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त झाले आहे.
ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७३३ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी १२७९ शाळांना शिक्षण विभागाकडून संगणक संच देण्यात आले होते. त्यापैकी काही संगणक संच लोकवर्गणीतून, तर बहुतांश संगणक संच सर्वशिक्षा अभियानातून शाळांना देण्यात आले आहेत. सन २००३ - २००४ ते सन २०१२ - १३ या कालावधीत संगणकांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, आज शेकडो शाळांमधील संगणक संच बंद आहेत.
या संगणकांपैकी बहुतांश संगणक संच कालबाह्य झाले आहेत. यामधील बंद असलेल्या संगणकांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे हा भार उचलणार कोण? ही खरी मेख आहे. या बंद संगणक संचांच्या दुरुस्तीसाठी लागणारे पार्टही मिळत नाहीत. त्यामुळे शाळांमधील हे बंद संगणक शोभेच्या वस्तू बनल्या असून, मुलांना संगणक शिक्षण देण्यासाठी घेतलेले संगणकच आता बंद पडल्याने पुन्हा संगणक शिक्षणाची गाडी अडली आहे.
२५ टक्के संगणक बंद : योजनेला पंख फुटले पण...
संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे. हे ओळखून मुलांना योग्य वयात हे शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेची धडपड होती. ती यशस्वी होईल, असे वाटत असतानाच संगणक बंद पडले.
जिल्हा परिषदेच्या १२७९ शाळांमध्ये संगणक बसवण्यात आले आहेत. त्यापैकी ३५0हून अधिक संगणक बंद आहेत. दुरूस्तीला निधी नसल्याने ते सुरू होण्याची शक्यता नाही. २५ टक्के शाळांवर ही दुर्दैवी अवस्था आली आहे.
शिक्षणाचा खेळखंडोबा
संगणक शिक्षण देताना वीजजोडणी, दुरुस्ती देखभालीचा येणारा खर्च या सर्वच पातळ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने विचार केला नसल्याचे दिसून आले. त्यामुळेच संगणक शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.