एस्. टी. महामंडळाच्या खिशात २ कोटी
By admin | Published: September 22, 2016 12:46 AM2016-09-22T00:46:08+5:302016-09-22T00:46:08+5:30
गणपती बाप्पा पावले : गणेशोत्सव काळातील जादा गाड्यांमुळे उत्पन्नात वाढ
रत्नागिरी : गणेशोत्सवात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे १३५२ जादा गाड्या सोडल्या होत्या. त्याद्वारे एक कोटी ९१ लाख ६० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी सन २०१५मध्ये रत्नागिरी विभागाने १३२६ गाड्या सोडल्या होत्या, त्यावेळी १ कोटी ७१ लाख ३२ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत गाड्यांच्या संख्येत २६ने वाढ झाली आहे. शिवाय उत्पन्नात २० लाख २८ हजारांनी वाढ झाली आहे.
गणेशोत्सवात महामार्गावर खास जादा गाड्यांसमवेत गस्तीपथके तैनात करण्यात आली होती. चिपळूण व कशेडी येथे चेकपोस्ट, संगमेश्वर येथे दुरूस्ती केंद्र तर कशेडी ते संगमेश्वर व संगमेश्वर ते खारेपाटण मार्गावर गस्तीपथक तैनात करण्यात आले होते. याशिवाय महामार्गावर प्रशिक्षण बस तसेच खास पथकाव्दारे ‘स्पेशल पेट्रोलिंग’ करण्यात आले. एस. टी.तील चालक, वाहक, सर्व कर्मचारी, अधिकारीवर्ग यांच्या सहकार्यातूनच तसेच नियोजनाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने झाल्याने गणेशोत्सवातील एस. टी. प्रवास सुरक्षित झाला असल्याचे विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
यावर्षी सर्वाधिक उत्पन्न चिपळूण आगाराला उत्पन्न मिळाले, तर सर्वांत कमी उत्पन्न मंडणगड आगाराला मिळाले.
सन २०१३मध्ये रत्नागिरी विभागाने १३१७ गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे १ कोटी ८७ लाख ३८ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. २०१४मध्ये विभागाने १४३० जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी विभागाला दोन कोटी १० लाख ६९ हजारांचे उत्पन्न लाभले होते. गेल्या चार वर्षातील उत्पन्नात चढ-उतार सुरू आहे. कोकण रेल्वेव्दारे प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. २०१३, २०१४ या दोन वर्षात ऐन गणेशोत्सवातच रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. गतवर्षी व यावर्षी कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत होती. मुंबई, पुणे, बोरिवली, ठाणे, विठ्ठलवाडी, नालासोपारा, परळ, कल्याण आदी मार्गावर एस. टी.ने जादा गाड्या सोडल्या होत्या. गेल्या वर्षी रत्नागिरी विभागाचे उत्पन्न कमी होते. शिवाय गाड्याही कमी गेल्या. यावर्षी सुरूवातीपासूनच एस. टी.ला मागणी राहिली होती. गणेश चतुर्थीपर्यंत प्रवाशांचे आगमन सुरू होते. गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाठी गाड्या सोडल्या होत्या.
१५ तारखेपर्यंत परतीचा प्रवास सुरू होता. प्रवाशांचा एस. टी.ला चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे विभाग नियंत्रक बारटक्के यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुंबईहून प्रवाशांना घेऊन १४६८ गाड्या रत्नागिरीत आल्या होत्या, तर परतीसाठी १३५२ जादा गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या. याव्यतिरिक्त दररोज ८६ नियमित फेऱ्यांव्दारे प्रवासी वाहतूक सुरू होती. २४३ गाड्यांचे ग्रुप बुकिंग प्रवाशांकडून करण्यात आले होते.
सावट दूर झाले
गणेशोत्सवाच्या महिनाभर आधी महाड-पोलादपूर मार्गावरील सावित्री नदीवरील पूल तुटला होता. त्यात दोन एस्. टी. बसेस वाहून गेल्या. त्याचबरोबर यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस होता. त्यामुळे जादा एस्. टी. बसेसना मिळणारा प्रतिसाद कमी होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात गतवर्षीपेक्षा यंदा एस्. टी. महामंडळाच्या बसेसचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे.
४१३५२ एस. टी.च्या गाड्या
४गाड्यांच्या संख्येत २६ने वाढ
४२० लाख २८ हजाराने उत्पन्न वाढले
४गतवर्षी सोडल्या होत्या १३२६ गाड्या.