सिंधुदुर्गात सुसज्ज ट्रामा केअर सेंटर उभारणार : आदेश बांदेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 04:05 PM2018-02-23T16:05:52+5:302018-02-23T16:13:24+5:30
श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गानजीक एक सुसज्ज ट्रामा केअर सेंटर व सोळा डायलेसीस युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती या न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी : श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गानजीक एक सुसज्ज ट्रामा केअर सेंटर व सोळा डायलेसीस युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती या न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानासाठी या सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने एक कोटी रुपयांचा धनादेश बांदेकर यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी आज सर्व न्यास विश्वस्तांसह जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेतली. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत बांदेकर बोलत होते. पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सिद्धीविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष सुमंत घैसास यांच्यासह विश्वस्त गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, अॅड. पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवि जाधव उपस्थित होते.
आदेश बांदेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गालगत सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे केली आहे.
न्यासाकडून जिल्ह्यात ट्रस्टच्या माध्यमातून १६ डायलेसीस मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात जिल्हा रूग्णालयात २, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात २, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ४, मालवण ग्रामीण रुग्णालयात ४, देवगड ग्रामीण रुग्णालयात ४ या प्रकारात विभागणी करून डायलेसीस मशिन आणि आरओ प्लॅन्टस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सिद्धीविनायक मंदिर येथे भाविकांच्या माध्यमातून देणगी व दानाच्या स्वरूपात जमा होणारा फंड गरीब रूग्णांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचा न्यासाचा मानस आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे. अशा रूग्णांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या मर्यादेत राहून मदत केली जाते. गरजूंनी याचा उपयोग करून घ्या असे आवाहन आदेश बांदेकर यांनी केले.
पावणे दोन लाख पुस्तकांचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, अवघ्या २७५ रूपयांत डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लोकांचा निधी लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास अग्रेसर असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.
न्यासाकडून ३४ जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांसाठी साडेसात कोटी निधी खर्च करून १०२ डायलेसीस मशीन व आरओ प्लॅन्टस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपकरणाच्या खरेदीचा निधी हाफकीन कॉर्पोरेशन कंपनीला देण्याबाबत शासन मान्यता दिली आहे.
धनादेश सुपुर्द
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर व विश्वस्त मंडळ यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे एक कोटी रूपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक उपस्थित होते.