कृषी विकास कौन्सिल स्थापणार
By admin | Published: February 23, 2015 09:18 PM2015-02-23T21:18:55+5:302015-02-25T00:15:20+5:30
सुधीर सावंत : शेतकरी मेळाव्यात निर्धार
ओरोस : कोकणातील जनतेने कृषी विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे. शेतकरी बांधवांनी आपली एकजूट करून जमिनींचा शेतीतून विकास करावा. सर्वांच्या समन्वयातून कोकण कृषी विकास कौन्सिलची स्थापना करण्याचा निर्धार आपण करुया, असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आयोजित सिंधु अॅग्रो फेस्ट २०१५ च्या शेतकरी मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी प्रतिष्ठान अध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत, आमदार वैभव नाईक, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, कृषी अधिकारी नरेंद्र काकडे, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, डॉ. व्ही. आर. पवार, डॉ. विलास सावंत, दिनानाथ वेरणेकर, महाराष्ट्र बँकेचे डिंगणकर, राजश्री मानकामे, संतोष सावंत, वैभव पवार, कृषी कॉलेजचे प्राचार्य महेश परुळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे झालेल्या या मेळाव्यात बोलताना ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी कृषी विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्धार केला आहे.शेती, फळबागा, औद्योगिक वसाहती उभारून शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊया, कृषी विज्ञान केंद्र, शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य देईलच मात्र कृषी विकास कौन्सिलची स्थापना करून प्रत्येक महिन्यात आढावा घेऊन काम केल्यास झपाट्याने आमूलाग्र बदल जिल्ह्यात घडू शकतो, असा विश्वास सुधीर सावंत यांनी व्यक्त केला.आमदार वैभव नाईक म्हणाले, शासनाच्या माध्यमातून जमीन विकासासाठी नवीन योजना आणायाचा प्रयत्न असून जिल्हनयातील शेतकऱ्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस म्हणाले की, कृषी विकास प्रतिष्ठानचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. शरद पवार यांनी कृषी विकासासाठी हे भवन उभारले असून यापुढेही अशा होणाऱ्या कार्यक्रमासाठी हे भवन उपलब्ध करून दिले जाईल. यावेळी ऊसतज्ज्ञ माने पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील ऊस लागवड व विकासाचे रहस्य उलगडून सांगितले व ऊस शेतीकडे वळण्याचे आवाहन केले.दरम्यान, मुक्त विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश परुळेकर, डॉ. विलास सावंत व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त डॉ. मंदार गीते यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
६0 जणांचा गौरव
यावेळी दुग्ध व्यवसाय, शेती, कुक्कुटपालन, सेंद्रिय शेती, शेळीपालन, भात, नारळ, भाजीपाला, आदी क्षेत्रांतील प्रगतशील शेतकरी व बचतगटांच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व पुरुषांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये ६० जणांना गौरविण्यात आले.