व्हेलच्या उलटीसंदर्भात शास्त्रोक्त माहितीसाठी अभ्यास गटाची स्थापना

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 10, 2024 06:08 PM2024-05-10T18:08:12+5:302024-05-10T18:08:27+5:30

मत्स्य, वनविभाग व संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचा पुढाकार

Establishment of study group for scientific information on whale vomiting | व्हेलच्या उलटीसंदर्भात शास्त्रोक्त माहितीसाठी अभ्यास गटाची स्थापना

व्हेलच्या उलटीसंदर्भात शास्त्रोक्त माहितीसाठी अभ्यास गटाची स्थापना

संदीप बोडवे

मालवण : गेल्या काही वर्षांमध्ये व्हेलची उलटी म्हणजेच अंबरग्रीस सापडण्याचे प्रकार वाढले आहेत तसेच त्याच्या कथित तस्करीबद्दल मच्छिमार आणि किनारपट्टीतल्या भागातील लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. व्हेलच्या उलटीसंदर्भात प्रशासन, मच्छिमार आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात समज-गैरसमज आहेत. त्याचाच विचार करता व्हेलची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस या पदार्थाचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य, वनविभाग, संशोधन शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञ लोकांनी एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे.

आजही व्हेलच्या उलटीबाबत सत्यता तपासणारी यंत्रणा नाही किंवा त्या यंत्रणेला मर्यादा आहेत. त्यामुळे कायद्याचा दुरुपयोग, तसेच तस्करीसंदर्भात गोष्टी घडत असतात. अंबर ग्रीस हे स्पर्म व्हेलपासून उत्पन्न होते, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. स्पर्म व्हेल हा वन्यजीव प्राणी कायदा संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत येत असल्यामुळे त्याची उलटी अथवा शरीरातून उत्सर्जित होणारा पदार्थ हा पण संरक्षित केला गेला आहे. तो संरक्षित असावा की नसावा याबाबत तज्ज्ञांमध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्ये मत-मतांतरे आहेत.

यासाठीच व्हेलची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस या पदार्थाचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य, वनविभाग, संशोधन, शिक्षण क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञ लोकांनी एक अभ्यास गट स्थापन केला आहे. ज्यामध्ये मत्स्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉक्टर मंगेश शिरधनकर ,वनखात्याचे निवृत्त विभागीय वनसंरक्षक अधिकारी सुभाष पुराणिक, सावंतवाडी येथील एसपीके कॉलेजचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज, देवगड महाविद्यालयाचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक नागेश दप्तरदार, वनशक्ती फाउंडेशनचे दयानंद स्टॅलिन, मालवण येथील पर्यटन व्यवसायिक आणि विधी अभ्यासक प्रसन्न मयेकर व इतर मान्यवर यांचा समावेश आहे. या अभ्यास गटाबरोबर भारतातील राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या मत्स्य संशोधक केंद्राचे मान्यवर शास्त्रज्ञ मार्गदर्शन करत आहेत.

अभ्यास गटाशी संपर्क साधावा..

अभ्यास गटाने केलेला अभ्यास व संकलित केलेली माहिती ही प्रशासनाकडे सुपूर्द केली जाणार असून व्हेलच्या उलटीसंदर्भात कायद्यातील तसेच धोरणातील बदल यासाठी त्याचा उपयोग होईल अभ्यास गटाला विश्वास आहे. अभ्यास करताना मच्छिमार पारंपरिक ज्ञानाचा पण वापर केला जाणार आहे तसेच विविध महाविद्यालयामधील संशोधक व विद्यार्थी यांना विनंती करतो की यासंदर्भात कोणाकडे काही संशोधन, साहित्य अथवा पारंपरिक ज्ञान असेल त्यांनी संपर्क साधावा - रविकिरण तोरसकर, समन्वयक अंबरग्रीस अभ्यास गट

Web Title: Establishment of study group for scientific information on whale vomiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.