गणेशोत्सवासाठी विशेष पथकाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:38 AM2017-08-24T00:38:45+5:302017-08-24T00:38:45+5:30

Establishment of special squad for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी विशेष पथकाची स्थापना

गणेशोत्सवासाठी विशेष पथकाची स्थापना

Next



निलेश मोरजकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बांदा : गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्याने हा सण साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे येथून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होणार आहेत. यामुळे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी तसेच अपघात टाळण्यासाठी बांदा पोलिसांनी वाहतुकीचे विशेष नियोजन केले असून गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी गणेशोत्सव कालावधीत विशेष पथकाची स्थापना केली आहे.
बांदा शहर तसेच महाराष्ट्र-गोवा सिमेवर बांदा पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. यासाठी बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. या टिमचे महामार्गावरील वाहतुकीवर विशेष लक्ष असणार आहे. गणेश उत्सवातील बांदा पोलिसांच्या नियोजनाबाबत पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सविस्तर माहिती दिली.
सिंधुदुर्गातून गोव्यात जाताना तसेच गोव्यातून सिंधुदुर्गात येताना चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गाचा वापर करत असल्याने गणेश उत्सव कालावधीत हा महामार्ग नेहमीच गजबजलेला व वर्दळीचा असतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया जुना मुंबई-गोवा महामार्ग तसेच झाराप-पत्रादेवी बायपासवर वाहतुकीची वर्दळ असते. बांदा शहर हे संवेदनशील असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने बांदा पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर बांदा कट्टा कॉर्नर व सटमटवाडी येथे दोन ठिकाणी वाहतूक पोलीस चौकी ११ दिवसांच्या कालावधीसाठी ठेवण्यात येणार आहे. येथील पोलिसांचे महामार्गावरील वाहतुकीवर बारकाईने लक्ष असेल. चाकरमान्यांना प्रवास करताना अवजड वाहनांचा त्रास होऊ नये यासाठी अवजड वाहनांना महामार्गाच्या दुतर्फा थांबवून ठेवण्यात येणार आहे. बांदा पोलीस ठाण्यात एक अधिकारी व ४० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. गोव्यातील पेडणे तालुका तसेच बांदा दशक्रोशीतील ३0 ते ३५ खेड्यांची बांदा ही मुख्य बाजारपेठ असल्याने बांदा बाजारपेठेत नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. गणेश उत्सव कालावधीत बांदा शहरात होणाºया वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शहरात कट्टा कॉर्नर चौक, नट वाचनालय, विठ्ठल मंदिर नाका, आळवाडी येथे बॅरिकेट्स लावण्यात येणार आहेत. यामुळे बाहेरुन येणाºया वाहनांना बांदा शहरात प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी कट्टा कॉर्नर, महामार्गावरील सर्कलजवळ, मच्छिमार्केट-आळवाडी रस्ता, बांदेश्वर नाका, गांधीचौक बाजारपेठ, बसस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. बांदा शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बांदा ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कट्टा कॉर्नर चौकात ‘वन-वे’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून वाहनांचीही कसून तपासणी होणार आहे. भाविकांनी गोव्यातून मुंबई, पुणे येथे जाण्यासाठी आंबोली घाट मार्गाचा वापर करावा. इन्सुली तपासणी नाका व कट्टा कॉर्नर चौकात पोलिसांकडून माहिती फलक लावण्यात आले आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
पार्किंग स्पॉट
या वाहनांसाठी शहरात ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ठिकठिकाणी ‘पार्किंग स्पॉट’ तयार करण्यात आले आहेत. बाजारपेठेतील गांधीचौक येथे सार्वजनिक गणपती असल्याने येथे देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याठिकाणी देखील ११ दिवस कालावधीसाठी होमगार्ड ठेवण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीपूर्वी दोन दिवस बांदा बाजारपेठ माटवीच्या साहित्याने गजबजणार आहे. या दोन दिवसांत खरेदीसाठी गर्दी होणार असल्याने बांदा पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत.

Web Title: Establishment of special squad for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.