सी वर्ल्ड प्रकल्पासाठी अभ्यासगट स्थापन
By admin | Published: December 13, 2014 11:48 PM2014-12-13T23:48:49+5:302014-12-13T23:48:49+5:30
बाबा मोंडकर यांची माहिती : भाजप प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील
मालवण : वायंगणी-तोंडवळी येथे होऊ घातलेल्या सी वर्ल्ड प्रकल्पाच्या उभारणीबाबत यापूर्वीच्या शासनाने घातलेला घोळ तसेच या प्रकल्पाचे नेमके स्वरूप समोर न आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. यातूनच या प्रकल्पाला तीव्र विरोध झाला. मात्र, पर्यटन विकासासाठी सी वर्ल्ड प्रकल्प अत्यंत गरजेचा आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी भाजपा प्रयत्नशील असून हा प्रकल्प सर्व अडीअडचणी दूर करून मार्गी लावण्यासाठी भाजपातर्फे सी वर्ल्ड प्रकल्पासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आला असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.
येथील भाजपा कार्यालयात तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी विलास हडकर, भाऊ सामंत, मनोज मोंडकर, अविनाश पराडकर, समीर बावकर, विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना मोंडकर म्हणाले, यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने सी वर्ल्ड आणण्यासाठी ग्रामस्थांवर हुकूमशाही पद्धतीचा अवलंब केला. हा विषय तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी चुकीच्या पद्धतीने हाताळला. यामुळेच ग्रामस्थांनी या प्रकल्पास विरोध दर्शविला. या अभ्यासगटाचे अध्यक्षपद विलास हडकर यांच्याकडे सोपविण्यात आले असून यामध्ये भाऊ सामंत, अविनाश पराडकर, बाबा मोंडकर, समीर बावकर, मनोज मोंडकर, गुरुनाथ राणे, विजय केनवडेकर यांचा समावेश आहे असेही त्यांनी सांगितले.
अभ्यासगटाच्या माध्यमातून सी वर्ल्डच्या आराखड्याची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना दिली जाईल. तसेच ग्रामस्थ, गावकमिट्या यांच्या भेटी घेऊन प्रकल्प होण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांचे सकारात्मक मत परिवर्तन केले जाईल. प्रकल्प उभारणीच्या कामात पारदर्शकता आणून ग्रामस्थांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. (प्रतिनिधी)
शिवसेना आता सकारात्मक होईल
शिवसेना यापूर्वी प्रकल्पास विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या बाजूने होती. मात्र, आता भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी शिवसेनाही सकारात्मक भूमिका घेईल असा विश्वास यावेळी विलास हडकर यांनी व्यक्त केला.