विद्यार्थ्यांच्या वसतिगृह उभारणीसाठी गरूडझेप
By Admin | Published: November 19, 2015 09:18 PM2015-11-19T21:18:41+5:302015-11-20T00:13:12+5:30
महालक्ष्मी महिला बचत गट - शीळ
महिला बचत गटांच्या चळवळीला विविध माध्यमांचे सहकार्य मिळाल्याने आता ग्रामीण भागातील महिलाही एकोप्याने विविध व्यवसायात उतरल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करतानाच इतरही पूरक व्यवसाय करू लागल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. कुटुंबातच नव्हे तर समाजातही त्यांची पत आता वाढू लागली आहे. रत्नागिरी शहरानजिकच्या शीळ येथील महालक्ष्मी महिला बचत गट हा असाच कष्टकरी महिलांच्या सहभागातून स्थापन झाला. सुरूवातीला शालेय पोषण आहार, विविध प्रकारच्या पीठांची विक्री या बचत गटाने केली. आता तर हा बचतगट रत्नागिरी विमानतळनजिक उत्तमरित्या कँटीन चालवत आहे. या भागात असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन या बचत गटाने वसतिगृह उभारण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.
२७ जुलै २००७ रोजी रत्नागिरी पंचायत समितीच्या माध्यमातून शीळ गावातीलच रेश्मा शीळकर यांच्या पुढाकाराने दहा महिलांचा मिळून महालक्ष्मी महिला बचत गट स्थापन करण्यात आला. यासाठी ग्रामसेवक तानाजी बडद यांचे या महिलांना मार्गदर्शन मिळाले. यातील आठ महिला दारिद्रय रेषेखालील होत्या. या सर्व महिलांच्या आर्थिक कुवतीनुसार मासिक २५ रूपये बचतीवर या बचत गटाचे काम सुरू झाले. सुरूवातीला २५ हजार रूपयांपर्यंत बचत गटाच्या सदस्य महिलांसाठी कर्ज देण्यास बचत गटाने सुरूवात केली. कर्ज घेतलेल्या महिला त्या कर्जाची परतफेड अगदी नित्यनेमाने करत. या महिलांनी गावातल्या गावात विविध घरगुती पीठे तयार करून देण्याच्या व्यवसायाला सुरूवात केली. हळूहळू या व्यवसायाला गती मिळाली. त्यातूनच या महिलांचा आत्मविश्वासही वाढू लागला. काहीतरी वेगळा व्यवसाय करायला हवा, असा विचार या महिलांच्या मनात तरळू लागला.
ग्रामसेवक बडद यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षानंतर सन २००९मध्ये या महिलांनी रत्नागिरी शहरानजिकच्या विमानतळ परिसरात शीळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जागेत तयार गाळा घेतला आणि तिथे जनरल स्टोअर्स सोबतच कँटीन सुरू केले. यात वडापाव, पॅटीस, भेळ, चिकनपाव, भाजीभाकरी असे पदार्थ ठेवण्यास सुरूवात केली. या भागात विविध शैक्षणिक संस्था आहेत. शिक्षण घेण्यासाठी रत्नागिरी बाहेरचे विद्यार्थी, विद्यार्थिनी या ठिकाणी येतात. त्यांच्या नाश्त्याची, जेवणाची सोय यामुळे झाली आहे. हे पदार्थ रूचकर असल्याने आता इतर ठिकाणाहूनही या महिला आॅर्डर्स घेत आहेत. सर्व महिला मिळून हा व्यवसाय उत्तमरित्या करत आहेत.सुरूवातीला या महिलांनी वैनगंगा बँकेकडून अडीच लाख रूपयांचे कर्ज घेतले आणि त्याची नियमित परतफेडही केली. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने पुन्हा या महिलांनी बँक आॅफ इंडियाकडून तीन लाखाचे कर्ज घेतले. यातून व्यवसायासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी केले. बँकांच्या सहकार्यामुळे या महिलांना आता बँकांमधील देवघेव, आर्थिक व्यवहार समजू लागले आहेत. कर्जाची परतफेड नियमित होत असल्याने आता बँकाही या बचत गटाच्या विविध उपक्रमांसाठी अर्थसहाय्य करण्यास पुढे येत आहेत. या कँटीनमध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या बचत गटातील महिला या कष्टकरी असल्याने आपल्या व्यवसायाला पूर्ण वेळ देत आहेत. रेश्मा शीळकर यांचे बंधू संतोष सावरटकर हे सुतारकाम करतात. त्यांची मोलाची मदत या महिला बचत गटाला झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आता या बचत गटाला सुमारे ४० विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प खुणावत आहे. त्यासाठी या महिलांनी जागाही निश्चित केली आहे. यासाठी कितीही प्रयत्न करण्याची तयारी या बचत गटाची आहे. हे वसतिगृह झाले तर या भागातील विद्यार्थ्यांची सोय होईलच पण त्याचबरोबर बचत गटाच्या सदस्यांबरोबरच इतरही अनेक हातांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा व्यवहारिक दृष्टीकोन या बचत गटाने ठेवला आहे. यासाठी आता या महिला बचत गटाची धडपड सुरू झाली आहे. हे वसतिगृह बांधणारा महालक्ष्मी महिला बचत गट हा जिल्ह््यातील एक महत्वाकांक्षी बचत गट ठरणार आहे.
महालक्ष्मी महिला बचत गट - शीळ
रत्नागिरी तालुक्यातील शीळसारख्या ग्रामीण भागात कष्टकरी महिलांनी तयार केलेल्या महालक्ष्मी बचत गटाचा डोलारा अध्यक्षा रेश्मा शीळकर यांच्या नेतृत्वाखाली सचिव मीनल गावडे, उपाध्यक्ष विनीता विचारे तसेच रसिका शीळकर, सुशिला शीळकर, अंजली पाटील, सुवर्णा बारगुडे, सुनीता चापडे, लक्ष्मी मोहिते, मालती सावंत आदी सदस्या सांभाळत आहेत. या भागातील मुलांची गैरसोय लक्षात घेऊन ४० मुलांच्या राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था असलेले वसतिगृह उभारण्याचा भव्य उपक्रम या महिला बचत गटाने हाती घेतला आहे. त्याच्या पूर्ततेच्या दिशेने या बचत गटाची वाटचाल सुरू आहे.
- शोभना कांबळे