घरपट्टी भरल्यानंतरही पालिकेने ठोकले घराला सील
By admin | Published: April 12, 2015 10:27 PM2015-04-12T22:27:51+5:302015-04-13T00:05:56+5:30
वसुली पथकाने सील ठोकल्याने ८५ वर्षांच्या आईसह आपल्याला बेघर व्हावे लागले.
वेंगुर्ले : थकीत घरपट्टी वसुली मोहिमेत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या पथकाने राबविलेल्या कारवाईत घरपट्टी भरूनही घराला सील मारण्याची व पैसे भरण्याबाबतची विनंती करूनही घरांना सील मारण्याच्या घटना ३१ मार्च रोजी घडल्या. याबाबत घरपट्टीधारकाने पैसे भरल्याचे नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून देताच मारलेले सील काढण्यात आले. तर सील मारल्याने बेघरची परिस्थिती उद्भवलेल्या महिला नागरिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सील काढण्याची विनंती करूनही अद्यापपर्यंत सील काढलेले नाही.
दरम्यान, थकीत घरपट्टी वसुलीसाठी आलेल्या नगरपरिषदेच्या पथकाने वेंगुर्ले, कॅम्प-म्हाडा वसाहतीतील एम २५ मधील अॅड. सुप्रिया देसाई यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये घरपट्टी भरू नही त्यांच्या घरास सिल केले. मात्र, घरपट्टी भरल्याचा पुरावा दाखविताच सील काढण्यात आले. तर दूरध्वनीद्वारे तीन दिवसांनी म्हणजे ३० मार्च रोजी घरपट्टी भरते, असे सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केला. या वसुली पथकाने सील ठोकल्याने ८५ वर्षांच्या आईसह आपल्याला बेघर व्हावे लागले.
नगरपरिषदेने केलेली कारवाई अन्यायकारक असून नगरपरिषदेला सील काढण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी वेंगुर्ले-भटवाडी येथील वनिता मांजरेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
भटवाडी येथील घर नं. ३००, वॉर्ड नं. ३ मध्ये आपण आईसह राहत आहोत. दोन खोल्या असलेल्या मातीच्या भिंतीचे आमचे घर आहे. घरपट्टीत वाढ करताना आमचे घर मातीचे असल्याने घरपट्टी कमी करण्याची मागणी केली होती. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. माझी आई वारंवार आजारी असल्याने तिच्या औषधपाण्यासाठी मोठा खर्च होतो. मी घटस्फोटीत असून दोन व्यक्तींचा चरितार्थ चालविण्यासाठी आपल्याकडे भक्कम असा आर्थिक स्त्रोत नाही. केवळ मोलमजुरी करून आपण आईचा सांभाळ करीत आहे.
आमची ही परिस्थिती पालिका कर्मचाऱ्यांना माहिती असून आम्ही घरी नसताना घरपट्टी वसुली पथकाने थकीत घरपट्टीमुळे घरास सील ठोकले आहे. त्यामुळे आपण बेघर झालो असून सध्या घराशेजारी उघड्यावर राहत आहोत.
नगरपरिषद प्रशासनास आमच्या घराचे सील काढण्याच्या सूचना देऊन न्याय द्यावा, अशी मागणी वनिता मांजरेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. (प्रतिनिधी)