खरीप हंगाम संपला तरी शेतकऱ्यांना अवजारांची प्रतीक्षा, काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:43 AM2019-07-17T11:43:13+5:302019-07-17T11:47:47+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरिप हंगाम संपत आला तरी राज्य शासनाच्या कृषी अधीक्षक विभागातून शेतकऱ्यांना कृषी अवजारे मिळाली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस आक्रमक बनली आहे. जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटनेच्या पदाधिका-यांनी जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके यांना घेराव घालून जाब विचारला.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात खरिप हंगाम संपत आला तरी राज्य शासनाच्या कृषी अधीक्षक विभागातून शेतकऱ्यांना कृषी अवजारे मिळाली नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस आक्रमक बनली आहे. जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटनेच्या पदाधिका-यांनी जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके यांना घेराव घालून जाब विचारला.
कृषी अवजारांसाठी उद्दीष्ट व निधी प्राप्त नसल्याने आपण कृषी अर्जांना मंजुरी कशी द्यायची? असा प्रश्न शेळके यांनी उपस्थित केला. मात्र, जिल्हाध्यक्ष सावंत यांनी विभागीय कृषी सहसंचालक यांच्या पत्राचा आधार घेत त्यानुसार कार्यवाही करा व येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या कृषी अवजारांसाठीच्या अर्जाला पूर्व परवानगी द्यावी, अन्यथा आपल्या कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या दालनात घेवून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.
जिल्हयातील शेतकऱ्यांना अद्याप कृषी अवजारे मिळाली नसल्याने जिल्हा काँग्रेसने कृषी अधीक्षक शिवाजी शेळके यांना धारेवर धरले. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, प्रांतीक सदस्य तथा प्रवक्ते काका कुडाळकर, माजी सभापती बाळा गावडे, महिला काँग्रेस राज्य सदस्य विभावरी सुकी, जिल्हा युवक कार्याध्यक्ष सिद्धेश परब, संतोष तावडे, अल्पसंख्याक अध्यक्ष सर्फराज नाईक, उल्हास मणचेकर, सुधीर मल्लार, विनायक वर्णेकर, मोसील मुल्ला, विजय प्रभू अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडू
आपण कृषी सहसंचालक यांच्या पत्राचा आधार घेऊन कार्यवाही करावी. तसेच याबाबत तालुका कृषी अधिका-यांना शेतकऱ्यांच्या अर्जांना पूर्व परवानगी देण्यात यावी अशी सूचना शेळके यांना विकास सावंत यांनी केली. उद्दीष्ट व अनुदान नसेल तर काहीच फायदा होणार नाही असे उत्तर शिवाजी शेळके यांनी दिले. यावर काँग्रेस शिष्टमंडळ आक्रमक होत शेळके यांना धारेवर धरले. अशी बेजबाबदार विधाने करताना आपल्याला काहीच का वाटत नाही. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांना कृषी अवजारे मिळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सावंत यांनी दिला.