छोटे, मोठे उद्योगही ठप्प; रेल्वे, बससह खासगी व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 04:05 PM2020-05-02T16:05:57+5:302020-05-02T16:07:56+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: १५ हजार रिक्षा चालक-मालक असून त्यापैकी अनेकांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे रिक्षा धंदा पुन्हा केव्हा सुरू होणार याची प्रतिक्षा ते करीत आहेत .

Even small, large industries stagnate; Private business in trouble with railways, buses | छोटे, मोठे उद्योगही ठप्प; रेल्वे, बससह खासगी व्यवसाय अडचणीत

छोटे, मोठे उद्योगही ठप्प; रेल्वे, बससह खासगी व्यवसाय अडचणीत

Next
ठळक मुद्देकोरोना विषाणूचा फटका :  रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

ओंकार ढवण ।

कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. मीटर डाऊन केले तरच संसाराचा गाडा चालणारे रिक्षा चालक व मालक यातून वाचलेले नाहीत. यापुढील काळात लॉकडाऊन कायम राहीले तर अनेक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने रेल्वे, बससेवा, शासकीय कार्यालयातील प्रवाशांची येण्याजाण्याची सोय करून एक रिक्षा चालक-मालक किमान तीनशे ते पाचशे रुपये दिवसाकाठी मिळवत असतो. मात्र, सध्या रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे कर्जबाजारी होऊन त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: १५ हजार रिक्षा चालक-मालक असून त्यापैकी अनेकांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे रिक्षा धंदा पुन्हा केव्हा सुरू होणार याची प्रतिक्षा ते करीत आहेत .

राज्यात ह्यकोरोनाह्ण चे रूग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मार्च महिन्यापासून एसटी बसेसच्या फेऱ्या कमी करण्यास प्रारंभ झाला. त्याबरोबरच रिक्षा चालकांना देखील प्रवासी वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे .

आता तर एसटीची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर रिक्षा वाहतूक देखील पूर्णपणे बंद झाली आहे. रिक्षा व्यवसाय करणे म्हणजे दिवसभर काम केल्यानंतरच त्या व्यावसायिकाच्या घरात चूल पेटते असे चित्र आहे. तसेच भाड्याने रिक्षा चालवणाऱ्यांची अवस्था तर त्याहून अधिकच वाईट झाली आहे.

त्यातच स्वत:चे घर असलेले रिक्षा चालक मालक फारच कमी आहेत . बहुतांश रिक्षा चालक मालक भाड्याने खोली घेऊन राहतात. नवीन रिक्षा असेल तर कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, आरटीओ परवाना नूतनीकरण, पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती, विविध भागांच्या वाढत्या किंमती, देखभाल - दुरूस्ती यामुळे हा व्यवसाय फारच अडचणीत आला आहे.
संचारबंदीमुळे रिक्षा फिरायची बंद झाल्यानंतर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न रिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे. अनेकांनी उदरनिर्वाहासाठी कर्जे काढून किराणा माल भरला आहे. भाजीपाला परवडत नसल्यामुळे भाकरी आणि आमटी - भात खाऊन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे .

उधारीवर किराणा माल मिळत नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करायच्या तरी कशा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. दैनंदिन खर्च, घरभाडे, दवाखान्यातील औषधोपचार यासाठी कर्जाने घेतलेले पैसे संपत आले आहेत.
त्यामुळे कोरोनाचे संकट दूर होऊन कधी एकदा रिक्षा रस्त्यावरून धावणार? याची प्रतिक्षा अनेक रिक्षा चालकांना लागली आहे. त्यामुळे शासनाने या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी रिक्षा चालक, मालकांकडून करण्यात येत आहे.

शासनाने मदत करावी
कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास १५ हजार रिक्षा चालक, मालक आहेत . त्यांच्यापैकी अनेकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे . मजूरांप्रमाणेच रिक्षा चालकांची परिस्थिती असते. त्यामुळे रिक्षा चालकांना शासनाकडून मदतीची निश्चितच अपेक्षा आहे, असे मत रिक्षा चालक रवींद्र कोरगावकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Even small, large industries stagnate; Private business in trouble with railways, buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.