मुलांच्या भविष्यासाठी सर्वांनी एक व्हावे
By admin | Published: March 30, 2015 08:40 PM2015-03-30T20:40:02+5:302015-03-31T00:29:43+5:30
आदेश बांदेकर : तळेरे येथील भू संपादन सोहळा
नांदगाव : मुंबई विद्यापीठाचे हे मॉडर्न महाविद्यालय तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी चांगले असून यासाठी सर्वांनी एकवटून साथ दिली पाहिजे. भविष्यात उभे राहणारे हे महाविद्यालय उत्तम असून शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या आपल्या ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची उत्तम संधी निर्माण केली आहे, असे प्रतिपादन अभिनेते आदेश बांदेकर यांनी केले. तळेरे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनमध्ये रविवारी आयोजित केलेल्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या भूसंपादन सोहळ्यात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी वामनराव महाडिक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आदेश बांदेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्या हस्ते संबंधित भूमीचे पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा देवयानी परब, शाळा समितीचे अध्यक्ष बापू तळेकर, सरपंच दर्शना बांदिवडेकर, उपसरपंच शशांक तळेकर, श्रावण बांदिवडेकर, प्राचार्य विष्णू मगरे, मुंबई विद्यापीठाचे मुख्य अभियंता विनोद पाटील, शेखर परब, प्रा. विनायक दळवी, गोवा विद्यापीठाचे खानोलकर, प्राचार्य टी. बी. घोळवे, शशिकांत वरूणकर, अरविंद महाडिक, चंद्रकांत तळेकर, शिक्षण समितीचे सदस्य, शिक्षक आदी उपस्थित होते.
बांदेकर म्हणाले, आमच्या गुरूंनी आमच्यावर संस्कारच असे केलेत की, ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्रात आम्ही आत्मियतेने काम करतो. आम्ही आमचे शंभर टक्के योगदान तिथे देतो. प्रत्येकवेळी काहीतरी चांगले करता येईल का यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न असतात. तळेरेसारख्या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे हे मॉडर्न महाविद्यालय होत आहे. यामुळे तळेरेसह दशक्रोशीतील ग्रामीण भागातील असंख्य मुलांना याचा फायदा होईलच. शिवाय या भागाचाही यामुळे कायापालट
होईल.
प्रा. मगरे म्हणाले, गेली अनेक वर्षे अव्याहतपणे तळेरे पंचक्रोशी शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रात काम करीत आहे. नव्याने याठिकाणी होऊ घातलेले मॉडर्न महाविद्यालय हे प्रत्येकजण आपल्या पायावर उभे राहण्यासाठी पुढाकार घेणार आहे. याची मुहूर्तमेढ आज होत आहे. यावेळी शिवसेना खारेपाटण विभागाच्यावतीने आदेश बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला.
देवयानी परब यांनी तळेरे येथील २ एकर जमिनीची कागदपत्रे मुंबई विद्यापीठाचे विनोद पाटील यांच्याकडून सुपूर्द केली. यावेळी विनोद पाटील, विनायक दळवी, शेखर परब यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन टी. बी. घोळवे यांनी केले.(वार्ताहर)
दोनच मॉडर्न कॉलेजना मान्यता
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळेरे येथे तर मंडणगड तालुक्यात आंबड अशा दोन ठिकाणी ही मॉडेल कॉलेज मंजूर झाली आहेत. यामुळे परिसराची नक्कीच डेव्हलपमेंट होणार आहे. तळेरे येथे होणाऱ्या या कॉलेजसाठी ८ कोटी निधी मंजूर असून पुढील वर्षभरात अजून २० कोटी निधी मंजूर होईल. या महाविद्यालयामुळे विद्यार्थी संख्येसह गुणवत्ताही वाढीस लागेल. तर भविष्यात पाच वर्षात मुंबई विद्यापीठात अग्रगण्य तर १० वर्षात राज्यातील अग्रगण्य असलेले हे महाविद्यालय असेल.
हे महाविद्यालय शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठे होईल, अशी माहिती यावेळी विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे प्रा. विनायक दळवी यांनी दिली.