देशासमोर प्रत्येकाने नतमस्तक झाले पाहिजे
By admin | Published: March 27, 2016 11:15 PM2016-03-27T23:15:01+5:302016-03-28T00:08:24+5:30
शिवरत्न शेटे : सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे सावंतवाडीत शिवजयंती उत्सव
सावंतवाडी : शिवाजी महाराजांकडे राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांची कमतरता नव्हती. बलिदानाची भावना ही राष्ट्र भक्ती आणि ध्येयवादातून येत असते. शिवाजी महाराज ध्येयवादी होते. मतभेद कितीही ठेवा, पण आपल्या भारतमातेसमोर प्रत्येकाने नतमस्तक झालेच पाहिजे, असे कळकळीचे आवाहन शिवचरित्रकार तथा हिंदवी परिवाराचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
ते येथील बॅ. नाथ पै सभागृहात शिवजयंतीनिमित्त सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे ‘रयतेचे राजे शिवराय आमुचे’ या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने रयतेतील १२ बलुतेदार व १८ पगड जातीतील २० व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. शेटये यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे, सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष शामराव सावंत, नगरसेविका अफरोज राजगुरू, क्षिप्रा सावंत,माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर आदी उपस्थित होते.
फक्त शिवजयंतीदिनीच ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देऊन, महारॅली काढत गुलालाची उधळण करून शिवभक्त होता येत नाही. शिवभक्त होण्यासाठी कृतीशील व्हायला हवे. भारतमाता म्हटल्यावर नतमस्तक व्हायलाच हवे. हीच खरी राष्ट्रभक्ती अन् निष्ठा आहे. जे हुतात्मे शहीद झाले आणि जे सैनिक आहेत, त्यांच्या कुटुबीयांना जपा. त्यांच्यावर प्र्रेम करा, असे आवाहन डॉ. शेटये यांनी केले. मुंबईतील २६/११ चा हल्ला म्हणजे आर्थिक, वैज्ञानिक राजधानीवर तसेच उद्याची महाशक्ती होऊ पाहत असलेल्या महाराष्ट्रावर व भारतीय ऐक्याच्या सिध्दांतावरील हल्ला व युध्द होते. या युध्दात मुंबई पोलिस शिवचरित्र नजरेसमोर ठेवून लढले. दुसरीकडे ‘भारतमाता की जय’ म्हणायला ओवेसी राजी नाहीत आणि कन्हैय्या या महाराष्ट्राचा आयडॉल होतोच कसा, असा सवाल डॉ. शेटे यांनी केला.
यावेळी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, साडेतीनशे वर्षे झाली, तरी छत्रपतींचे नाव आपण विसरू शकत नाही. मात्र, आजच्या काळातील राजकारणी काळानुसार पडद्याआड झाले. महाराष्ट्राचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वक्तव्य केलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या घोषणेवेळी छत्रपती शिवाजी महाराज हवे होते. मात्र, आजचे सरकार अणेंचे समर्थन करत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा खुर्चीवर बसण्याचा त्यांना अधिकार नाही, असे डॉ. शेटे म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अनिता रसाळ (सावंतवाडी), आनंद चव्हाण, अर्जुन शिरोडकर, भरत पानवळकर, एकनाथ आजगावकर, खेमदास नाईक, महादेव गावडे, मालती नाईक, प्रियांका दळवी (कोलगाव), रवींद्र परब (कारिवडे), श्रावण गोवेकर, सुभाष राऊळ, सुविता पावसकर, तुषार जुवेकर (माणगाव), विश्राम कांबळी (चराठा), विलास मेस्त्री, विठ्ठल कोकरे यांना गौरविण्यात आले. (वार्ताहर)