माजी विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Published: October 10, 2015 11:41 PM2015-10-10T23:41:07+5:302015-10-10T23:50:42+5:30

बांद्यातील खेमराज महाविद्यालयातील घटना

Ex-student detention officers | माजी विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

माजी विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

Next

बांदा : गतिरोधकाच्या मागणीसाठी महामार्गावर खेमराज प्रशाळेची परवानगी न घेता विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचे उघड झाल्याने माजी विद्यार्थ्यांनी प्रशाळेत धडक देत बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी एम. डी. मोरबाळे यांना शनिवारी घेराव घातला. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांना तासभर धारेवर धरत राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना वेठिस धरुन आंदोलन करणे चुकीचे असून राजीनामा न दिल्यास प्रसंगी व्यापक आंदोलन करण्याचा इशारा माजी विद्यार्थ्यांनी दिला.
बसस्थानकात येणाऱ्या एसटी बसेस महामार्गावरुन वळविण्यासाठी महामार्गावर गतिरोधक बसविण्यात यावेत, या मागणीसाठी खेमराज प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात खेमराज प्रशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा समावेश नव्हता. यामुळे या आंदोलनात विद्यार्थ्यांना नाहक वेठिस धरण्यात येत असल्याचा आरोप माजी विद्यार्थ्यांनी केला. शनिवारी सकाळी ११ वाजता बांद्यातील सुमारे ५0 ते ६0 माजी विद्यार्थ्यांनी प्रशाळेत धडक देत संस्थेचे प्रशासकीय अधिकारी एम. डी. मोरबाळे यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.
विद्यार्थ्यांवर दबाव टाकून त्यांना आंदोलनात उतरवण्यात आल्याचा आरोप विशांत पांगम यांनी केला. यावर मोरबाळे यांनी सांगितले की, विद्यार्थी वेळेत महाविद्यालयात येतील, यासाठी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसारच हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक शिवाजी दळवी, समन्वय समिती सचिव देविदास मोरे, शालेय समिती निमंत्रित सदस्य मकरंद तोरसकर आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या आंदोलनाला परवानगी दिली होती का? अशी विचारणा केली असता, मुख्याध्यापक दळवी यांनी अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे शाळेच्या गणवेषात रस्त्यावर उतरणाऱ्या विद्यार्थ्यांवर आपण शाळा प्रशासनाने कोणती कारवाई केली, असा सवाल केल्यानंतर दळवी निरूत्तर झाले.
संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर हे १४ रोजी बांद्यात येत असून त्यावेळी आपण राजीनामा देऊ असे मोरबाळे यांनी सांगितल्याने हा धडक मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी यतीन धामापूरकर, तुषार धामापूरकर, मंदार धामापूरकर, केदार कणबर्गी, प्रितम हरमलकर, सनी काणेकर, सर्फराज खान, विकी कदम, साईप्रसाद काणेकर, धिरज भिसे, माजी सरपंच शितल राऊळ, अजिंक्य पावसकर, मिलिंद सावंत, सिद्धेश महाजन, हेमंत दाभोलकर, राकेश केसरकर, नंदू कल्याणकर, मंगलदास साळगावकर, ओंकार नाडकर्णी आदिंसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले असते तर त्यांच्या भविष्याची जबाबदारी तुम्ही घेतली असती काय? एखादा विद्यार्थी अपघातग्रस्त झाला तर त्याला जबाबदार कोण, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याची जबाबदारी शाळेची नव्हती का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी या आंदोलनाची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Ex-student detention officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.