उमेदवारांची परीक्षा!

By admin | Published: February 20, 2017 11:51 PM2017-02-20T23:51:13+5:302017-02-20T23:51:13+5:30

जि.प., पं. स. निवडणूक : ६६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

Examinations of candidates! | उमेदवारांची परीक्षा!

उमेदवारांची परीक्षा!

Next



रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी व ९ पंचायत समितींच्या ११० गणांसाठी निवडणूक होत आहे. एकूण ६६२ उमेदवार रिंगणात आहेत. १० लाख ७१ हजार ८१५ मतदार १५६४ केंद्रांवर मतदान करणार आहेत. मातब्बरांसह सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात नोंदविले जाणार आहे. गुरुवारी (दि. २३ फेब्रुवारीला) मतमोजणी होणार असून, विविध पक्षांनी मांडलेल्या सत्तेच्या गणिताचे गूढ निकालानंतर उलगडणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी २३७, तर ९ पंचायत समितींच्या ११० जागांसाठी ४२५ उमेदवार रिंगणात आहेत. बहुसंख्य ठिकाणी सेना, भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेस अशा तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत आहेत. सेना-भाजप युती तुटल्यानंतरची जिल्हा परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्ह्यातील सत्तेत हातात हात घालून काम करणारे सेना, भाजप एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणून आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसची काही तालुक्यांत आघाडी झाली आहे. शिवसेनेनंतर दुसरा प्रबळ पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील पाचपैकी ३ आमदार सेनेचे, तर २ आमदार राष्ट्रवादीचे आहेत. भाजप राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितींची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे.
जिल्ह्यावर असलेले सेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपने ताकद लावली आहे, तर भाजपचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सेनेने डावपेच आखले आहेत. गेल्यावेळी जिल्हा परिषदेत युतीची सत्ता होती. शिवसेनेकडे सर्वाधिक २७ सदस्यसंख्या होती. राष्ट्रवादीकडे दुसऱ्या क्रमांकाची १९ सदस्यसंख्या होती. भाजपकडे ८, कॉँग्रेसकडे ३ अपक्ष २ असे सदस्यांचे बळ होते. यावेळी सेना व भाजपची युती नाही. त्यामुळे युती म्हणून
मिळालेल्या मतांचे विभाजन अटळ आहे. त्याचा फटका कोणाला अधिक बसणार हे २३ फेब्रुवारीला निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाचीही या निवडणूक प्रक्रियेकडे करडी नजर आहे. निवडणूक शांततेत व्हावी, यासाठी शासकीय स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी
लक्षवेधी लढती...
संगमेश्वर तालुक्यातील कसबा गटात सेनेच्या रचना महाडिक, सेनेचे बंडखोर अपक्ष राजेश मुकादम, तर कोसुंब गटात भाजपचे प्रमोद अधटराव, राष्ट्रवादीच्या नेहा माने व सेनेचे रोहन बने यांच्यात अटीतटीचा सामना होत आहे. रत्नागिरीच्या शिरगाव गटात भाजप जिल्हाध्यक्ष सुरेंद्र माने यांच्या पत्नी माधवी माने व सेनेच्या स्नेहा सुकांत सावंत यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. नाचणे गटात राष्ट्रवादीचे प्रकाश रसाळ व सेना बंडखोर आणि भाजपचे उमेदवार नीलेश लाड यांच्यात, तर करबुडे गटात सेनेचे उदय बने, राष्ट्रवादीचे बाबू पाटील व भाजपचे सतीश शेवडे यांच्यात काटे की टक्कर होत आहे.

Web Title: Examinations of candidates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.