तटबंदीसाठी किल्ल्यातच उत्खनन
By Admin | Published: January 3, 2017 11:18 PM2017-01-03T23:18:54+5:302017-01-03T23:18:54+5:30
सिंधुदुर्ग किल्ल्यातील प्रकार : शिवप्रेमी, रहिवाशांत तीव्र संताप; ऐतिहासिकपणाला बाधा
मालवण : गेली ३५० वर्षे अथांग सागराच्या अजस्त्र लाटा झेलणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गची गेल्या काही वर्षांत पडझड झाली होती. त्यामुळे ढासळलेल्या तटबंदीचे काम ‘पुरातत्त्व’ विभागाकडून चार वर्षे युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असताना तटबंदी बांधकामासाठी किल्ल्यातील नैसर्गिक खडकाळ भाग तसेच वाळू उत्खनन करण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या ऐतिहासिकपणाला धोका निर्माण झाला असून याबाबत रहिवासी व किल्लेप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पुरातत्त्व विभागाकडून किल्ले सिंधुदुर्गचे ढासळलेले तीन बुरुज व एका भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. तटबंदीच्या कामासाठी ३४ कुशल कारागीर काम करीत आहेत.
काम अंतिम टप्प्यात आले असताना काही शिवप्रेमींनी सोशल मीडियावर किल्ल्यातीलच खडकाळ भाग फोडलेले व वाळू उत्खनन होत असलेले छायाचित्र प्रसारित केल्याने तटबंदीच्या कामाबाबत आणि पुरातत्त्व विभागाच्या कारभाराबाबत शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबतच्या धक्कादायक प्रकाराला किल्ले रहिवाशांनीही दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)
वाळू उत्खननाचे खड्डे
तटबंदीसाठी लागणारी वाळूही येथूनच उत्खनन केली जात असल्याने त्याठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. किल्ल्यातीलच दगडांप्रमाणे व वाळूचे उत्खनन होत असल्याचा खळबळजनक आरोप किल्ले रहिवासी यांच्यावतीने करण्यात आला आहे.
कुठलेही उत्खनन केले नाही
किरकोळ प्रमाणात तटबंदीचे दगड जोडणीसाठी किल्ल्यातील दगड वापरण्यात आले आहेत. बांधकामासाठी वापरण्यात येणारी वाळूही अत्यल्प प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारे दगड व वाळूचे उत्खनन होत नाही. यामुळे किल्ल्याच्या ऐतिहासिकपणाला कोणताही धोका पोहोचणार नाही.
-हरीश गुजराथी,
पुरातत्त्व विभागाचे किल्लेदार