विजयगडावर गुप्तधनासाठी खोदकाम
By admin | Published: March 20, 2016 09:26 PM2016-03-20T21:26:46+5:302016-03-20T23:55:48+5:30
राजमहल असलेल्या इमारतीच्या एका खोलीत अज्ञातांनी हे खोदकाम केले आहे. ही खोदाई काही दिवसांपूर्वी सुरु केली असावी,
गुहागर : तवसाळ येथे विजयगडावर अज्ञातांनी तब्बल १० फूट खोलीचे खोदकाम केले. या खड्ड्याशेजारी नारळ, उदबत्ती, दही यासारखे संशयास्पद साहित्य आढळून आल्याने हे खोदकाम जादूटोणा किंवा गुप्तधनाच्या लालसेने केले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजमहल असलेल्या इमारतीच्या एका खोलीत अज्ञातांनी हे खोदकाम केले आहे. ही खोदाई काही दिवसांपूर्वी सुरु केली असावी, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. तवसाळ गावातील काही मुले किल्ला भागात फिरकण्यासाठी गेली असता, प्रथम हा खड्डा निदर्शनास आला. याबाबत पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी विजयगडावर अज्ञातांनी खड्डा खणल्याचे व येथे आक्षेपार्ह वस्तू आढळल्याची तक्रार मिळाली आहे. याबाबतची वस्तुनिष्ठ पाहणी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी जातील. पंचनामा झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. (प्रतिनिधी)
याबाबतची माहिती गावातील मुलांनी देताच ग्रामस्थांसमवेत पाहणी केली. प्रत्यक्ष घटनास्थळी कोणीही सापडलेले नाही. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
- सत्यवान गडदे,
तवसाळ पोलीसपाटील