कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: March 25, 2015 09:45 PM2015-03-25T21:45:38+5:302015-03-26T00:11:07+5:30
कोकिसरेत प्रारंभ : आत्मा समिती, कृषी विभागाच्यावतीने आयोजन
वैभववाडी : स्थानिक शेतकऱ्यांचा शेतमाल, सुधारित शेती अवजारे, जिल्ह्यातील बचतगटांची विविध उत्पादने, बियाणी, शोभिवंत मासे, आदी स्टॉल्सनी सजलेल्या कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाला भेट दिलेल्या नागरिकांनी प्रगतशील शेतकऱ्यांसह विविध कृषीविषयक कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून प्रगत तंत्रज्ञानासह आधुनिक शेतीचे कौशल्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.आत्मा समिती आणि कृषी विभाग आयोजित दोनदिवसीय कृषी प्रदर्शनाला मंगळवारी कोकिसरेत प्रारंभ झाला. प्रदर्शनामध्ये नामवंत कृषी कंपन्यांसह बचतगट, प्रगतशील शेतकऱ्यांचे २५ हून अधिक स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्यामध्ये ताक, कलिंगडाचे सरबत यासह सुपारीच्या झाडाच्या पानापासून बनविलेल्या पत्रावळी, द्रोण, कृषी अवजारे, शोभिवंत मासे, फळभाज्यांची रोपे तसेच उत्तम प्रतीचे नारळ, सूर्यफूल, सुपारी, भोपळा, कलिंगड बियाणी आदी उत्पादने प्रदर्शनात पहायला मिळाली. (प्रतिनिधी)
नागरिकांकडून समाधान
बँकेच्या शेतीकर्ज योजना, आधुनिक कृषी अवजारांचा वापर, कीटकनाशके, बियाणी, आदींची माहिती शेतकऱ्यांना दिली जात होती. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना दुपारच्या भोजनाची सोय आयोजकांनी करून दिल्यामुळे प्रदर्शनाला भेट दिलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दुपारनंतर कृषी पर्यटनाच्या संधी तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धविकासाविषयी परिसंवाद झाला.