दोनशे वर्षांचा इतिहास असलेली गोकुळाष्टमी साजरी कासार्डेतील एकत्रित राणे कुटुंबाचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:33 PM2018-09-05T22:33:54+5:302018-09-05T22:35:40+5:30

The excitement of the combined Rane family in the Gokulashtami celebrations cassard with history of 200 years | दोनशे वर्षांचा इतिहास असलेली गोकुळाष्टमी साजरी कासार्डेतील एकत्रित राणे कुटुंबाचा उत्साह

दोनशे वर्षांचा इतिहास असलेली गोकुळाष्टमी साजरी कासार्डेतील एकत्रित राणे कुटुंबाचा उत्साह

Next
ठळक मुद्देविविध धार्मिक कार्यक्रम; ग्रामस्थांचाही सहभाग, तीन पिढ्यांचा अनोखा उत्सव

तळेरे : कणकवली तालुक्यातील कासार्डे साटमवाडीतील एकत्रित राणे कुटुंबातील गोकुळाष्टमीला सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. विशेष म्हणजे यानिमित्त खेळण्यात येणाऱ्या आगळ्यावेगळ्या खेळात अनेकांचे कसब लागते. गेल्या दोनशे वर्षांपासून वेगळ्या पद्धतीने अत्यंत धार्मिक वातावरणात अखंडित गोपाळकाला व गोकुळाष्टमी साजरी केली जात असल्याचे राणे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. यात अनेकजण सहभागही घेतात आणि गोपाळकाल्याचा आनंद लुटतात. दुपारी सुरू होणारा हा उत्सव सायंकाळपर्यंत चालतो. दिवसेंदिवस हा आगळावेगळा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतून असंख्य लोक येत असतात.

श्रावण महिना म्हणजे अनेक सण व उत्सवांची अक्षरश: मांदियाळीच असते. अलीकडे शहरी भागासह ग्रामीण भागातही दहीहंड्यांमध्ये स्पर्धा निर्माण होत असतानाच कासार्डेसारख्या गावात अशाप्रकारचा आगळावेगळा गोपाळकाला दोनशे वर्षांपासून अखंडपणे साजरा केला जात आहे.

अलीकडे राणे कुटुंबीयांसह गावातील अनेकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचेही दिसून येते. सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास असलेला हा सण मोठ्या आनंदात व उत्साहात पार पाडण्यासाठी राणे कुटुंबीय धार्मिक भावनेने सहभागी होतात.
याबाबतची माहिती देताना ते म्हणाले की, राणे कुटुंबातील राजबा राणे या मूळ पुरुषाने सुमारे दोनशे वर्षांपूर्वी या उत्सवाला सुरुवात केली. त्यापासून आजतागायत अव्याहतपणे हा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा होत आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी बाळकृष्ण आणि संपूर्ण गोकुळ कासार्डे साटमवाडी येथील राणे यांच्या मूळ घरात सवाद्य आणले जाते. त्यानंतर विधिवत पूजा करून रात्री १२ वाजता बाळकृष्णाला पाळण्यात घातले जाते आणि जन्माष्टमी साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील धार्मिक ग्रंथ वाचन, भजन, नवस बोलणे व फेडणे, प्रसाद वाटप व त्यानंतर महिलांच्या फुगड्यांचा कार्यक्रम रंगत जातो. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात.

गोकुळाष्टमीच्या दुसºया दिवशी गोपाळकाल्याला सुरुवात होते. यावेळी खेळल्या जाणाºया दहीहंडी या उत्सवाचे अनेकांना आकर्षण असते. कृष्णाच्या मूर्तिसमोर दहीहंडी सजवली जाते. यावेळी अनेकजण नवस बोलतात. राणे कुटुंबाच्या अंगणात सहा फूट अंतराने दोन खांब पुरतात. त्याभोवती रांगोळी घालून ढोलताशांच्या गजरात खांबाभोवती गोल रिंगण करून भजन म्हटले जाते. यावेळी वातावरण धार्मिक बनलेले असते. यावेळी असंख्य भाविक उपस्थित असतात. यानंतर खºया अर्थाने दहीहंडी साजरी होते. दरवर्षी हा खेळ आणि दहीहंडी पहायला असंख्य भाविक उपस्थित असतात. विशेष म्हणजे या उत्सवात वयोवृद्ध भाविकांचाही सहभाग असतो.

इतर दहीहंड्यांप्रमाणे मानवी मनोरे न उभारता ज्येष्ठ व्यक्तीला वर उडविले जाते. त्याच्या हातात असलेल्या सुरीने ही हंडी फोडायची असते. जोपर्यंत हंडी फोडत नाही तोपर्यंत त्याला वरती उडविले जाते आणि खालचे सर्वजण त्याला झेलतात. त्यानंतर अनेकांचे कसब पणाला लावणारा खेळ खेळला जातो. उपस्थित काहीजण त्या खांबाभोवती अक्षरश: झोपून खांब घट्ट पकडून ठेवतात. तर काहीजण तो खांब काढण्याचा प्रयत्न करतात.

यादरम्यान खूप मजा येते. दोन्हीही गट आपली ताकद लावत असतात. हा खेळ सुमारे दीड ते दोन तास चालतो. अशा खेळाद्वारे दहीहंडीसाठी उभारलेले दोन्हीही खांब काढल्यानंतर श्रीकृष्णाचे विसर्जन केले जाते. अलीकडच्या काही वर्षात कासार्डेसह परिसरातील अनेकजण ही दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी करतात. रात्री महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होते.


तीन पिढ्यांचा अनोखा उत्सव
या उत्सवामध्ये लहान मुले, तरुण पिढी आणि वयोवृद्धांचा मोठ्या संख्येने सहभाग होतो. एकप्रकारे तीन पिढ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असलेला दिसून आला. तर गावातील सर्व वयोगटातील ग्रामस्थ या उत्सवामध्ये सहभागी झाले होते. दरवर्षी या उत्सवाला येणाºया भाविकांची संख्या वाढलेली पहावयास मिळते.


कासार्डे साटमवाडी येथे राणे कुटुंबीयांची अनोख्या पध्दतीने साजरी करण्यात येणारी दहीहंडी अनेकांचे आकर्षण ठरत आहे.

Web Title: The excitement of the combined Rane family in the Gokulashtami celebrations cassard with history of 200 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.