बावशीत रुग्ण आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 02:47 PM2020-05-31T14:47:20+5:302020-05-31T14:49:20+5:30
दरम्यान, कणकवली तालुक्यातील बावशी शेळीचीवाडी येथील युवती १८ मे २०२० रोजी मुंबई-मालाड येथून आपल्या गावी दाखल झाली. इतरांप्रमाणे तिलाही बावशी शेळीचीवाडी येथील प्राथमिक शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते.
तळेरे : कणकवली तालुक्यातील बावशी शेळीचीवाडी शाळा येथे अलगीकरणात ठेवलेल्या युवतीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत परिसराचा सर्व्हे सुरू झाला आहे.
दरम्यान, अलगीकरणातल्या ७ जणांचे १४ दिवस पूर्ण होत असले तरी खबरदारी म्हणून त्यांना ओरोस येथे नेऊन त्यांचे अहवाल घेतले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्या युवतीच्या संपर्कातील एकाची तपासणी होऊन त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार असल्याचेही समजते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बावशी शेळीचीवाडी परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असल्याचे पोलीस पाटील समीर मयेकर यांच्याकडून सांगण्यात आले.
याबाबत अधिक वृत्त असे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींचे पॉझिटिव्ह अहवाल वाढत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, कणकवली तालुक्यातील बावशी शेळीचीवाडी येथील युवती १८ मे २०२० रोजी मुंबई-मालाड येथून आपल्या गावी दाखल झाली. इतरांप्रमाणे तिलाही बावशी शेळीचीवाडी येथील प्राथमिक शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते.
या शाळेत त्या युवतीसह आठ जण ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ मे रोजी त्या युवतीला सर्दी व ताप अशी लक्षणे आढळून आल्याने तिला २० मे रोजी तपासणीसाठी नांदगाव आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याचवेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना लक्षणे आढळून आल्याने तिला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
त्यावेळी तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून या अहवालाची प्रतीक्षा होती. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून या परिसरामध्ये सर्वेक्षण सुरू आहे. या युवतीच्या संपर्कात कोणी आले आहे काय ? याचा कसून तपास सुरू झाला आहे.
एक जण रुग्णाच्या संपर्कात आल्याने खबरदारी म्हणून त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. हा अहवाल येण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. ही पण धक्कादायक बाब असून या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये संपर्कातील असलेल्या व्यक्ती अजून किती जणांच्या संपर्कात आल्या हेही शोधणे गरजेचे झाले आहे.
दरम्यान, कणकवली तालुक्यातील वारगाव आणि परिसरातही शुक्रवारी रात्री उशिरा आणखी पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनासमोर डोकेदुखी ठरणार आहे. कणकवली तालुक्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पॉझिटिव्ह आढळलेले सर्वच रुग्ण हे मुंबई, पुणेसारख्या बाधित क्षेत्रातून आलेले आहेत. त्या सर्वांनाच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ग्रामीण भागात अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या अलगीकरणाचा कालावधी संपत आला तरी त्यांचे तपासणी अहवाल मिळत नसल्याने प्रशासनासमोर ती एक मोठी डोकेदुखी ठरत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वॅब तपासणी प्रयोगशाळा नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी ही प्रयोगशाळा त्वरित सुरू करण्याची मागणी लोकांमधून होत आहे.
त्या युवतीच्या प्रकृतीत होतेय सुधारणा बावशी शेळीचीवाडी शाळा येथे अलगीकरणात ठेवण्यात आलेल्या एका युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्या युवतीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्या शाळेच्या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ, कणकवलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, सरपंच सुप्रिया रांबाडे, ग्रामसेवक सचिन पवार, नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे, बावशी पोलीस पाटील समीर मयेकर तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी भेट देत माहिती घेतली. तसेच हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.