परिचालकांनी सावधानता बाळगावी
By admin | Published: April 9, 2015 10:41 PM2015-04-09T22:41:32+5:302015-04-10T00:24:59+5:30
वाद संगणक परिचालकांचा : लक्ष्मण गवस यांनी केले आवाहन
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही नव्याने डाटा आॅपरेटर परिचालकांची संग्राम कक्षाच्यावतीने राम पाटील यांनी भरती केली व नव्याने आम्ही काम करण्यास तयार असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांना काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र, नवीन संगणक परिचालकांची पिळवणूक होऊ नये व पगार थकू नये म्हणून सावधानता बाळगावी, असे बुधवारी दिलेल्या परिपत्रकात जिल्हा संगणक परिचालक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण गवस यांनी म्हटले आहे.
लक्ष्मण गवस यांनी या परिपत्रकात म्हटले आहे की, महाआॅनलाईन कॉन्ट्रॅक्टर म्हणून पुन्हा मान्यता मिळावी, यासाठी राम पाटील यांनी खटाटोप चालू केला आहे. ते जिल्ह्याचे समन्वयक असताना आम्ही काम करीत असताना जर संगणक परिचालकांचा पगार वेळेवर मिळाला असता तर आम्ही आंदोलने, उपोषणे करण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, या संग्राम कक्षात शासन निर्णयानुसार ८४०० रुपये मिळत असताना आम्हाला फक्त ४१०० रुपये मानधनावर काम करावे लागत होते. मात्र, आज आम्ही सर्व परिचालकांनी वर्षभर या ८४०० रुपये मानधनासाठी पुढाकार घेतला तेव्हा ते कोठे गेले होते. त्यावेळी आमच्या परिचालक बांधवांचा पगार तुटपुंजा देऊन त्यावरील मलई मात्र खात बसले होते.
आम्ही याकरिताच उपोषणे व आंदोलने केली व न्यायहक्कांसाठी आजपर्यंत लढत आहोत. संगणक परिचालकांना मिळणारा गणवेश, ओळखपत्र, तालुका व जिल्हास्तरावरील मिटिंग व ट्रेनिंग भत्ता, तसेच येण्या-जाण्याचा खर्च अद्याप दिलेला नाही.
जर उद्याच्या कोणत्याही महाआॅनलाईन कंपनीने टेंडर भरले (किंवा मिळाले) तरी हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारू. आमचा लढा शोषणासाठी व शोषकाविरुद्ध आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे टार्गेट देतात व इतर कामे करून घेतात. (उदा. पंचायत समिती स्तरावर अद्ययावत असलेल्या जन्म- मृत्यू नोंदी, निर्मल भारत अभियान, एमआरईजीएस पातळीवरून येणाऱ्या ग्रामपंचायत तपासणीचे अहवाल) ती पूर्ण करण्यासाठी सर्व रजा रद्द करण्याची पत्रे पाठविली गेली. मात्र, या शोषणाविरुद्ध कानावर हात ठेवतात, हेही अनाकलनीय आहे. मात्र, डाटा आॅपरेटर्सशी काहीच संबंध नाही तर जिल्हा समन्वयक राम पाटील त्यांना निवेदने का देतात? हेही मोठे कोडेच आहे व काम करण्यास ते तयार होतात. संग्राम कक्ष चालूच राहणार आहेत. तेथील लूट थांबवावी. यासाठी आमचा लढा सुरू राहील व नवीन परिचालकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन गवस यांनी केले आहे. (वार्ताहर)