नगराध्यक्षांना मुदतवाढ; उपनगराध्यक्ष निवडी

By admin | Published: June 11, 2014 12:30 AM2014-06-11T00:30:21+5:302014-06-11T00:36:02+5:30

वेंगुर्लेत वेंगुर्लेकर; सावंतवाडीत पोकळे उपनगराध्यक्ष

Expansion of municipal corporation; Suburban Selection | नगराध्यक्षांना मुदतवाढ; उपनगराध्यक्ष निवडी

नगराध्यक्षांना मुदतवाढ; उपनगराध्यक्ष निवडी

Next

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ले या तिन्ही नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांना सहा महिने मुदतवाढ देण्याचा अधिकृत निर्णय राज्यपालांच्या स्वाक्षरीने आज, मंगळवारी दुपारी १२ वाजता आला असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे या तिन्ही नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांना डिसेंबर २०१४ पर्यंत पदावर राहण्यास संधी मिळाली आहे, तर उपनगराध्यक्ष पदासाठी वेंगुर्लेत झालेल्या निवडीत मनसेचे अभी वेंगुर्लेकर आणि सावंतवाडीत राष्ट्रवादीचे राजन पोकळे यांची बिनविरोध निवड झाली.
विधानसभेची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी, पोलीस यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगराध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा, असे विधेयक मांडण्यात आले होते व ते मंजूरही करण्यात आले.
विधानसभेच्या निवडणुका आॅक्टोबरमध्ये असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले व मालवण या तिन्ही नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचा कालावधी जून २०१४ मध्ये पूर्ण होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नगराध्यक्षपद निवडीच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे मालवणचे नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, वेंगुर्लेच्या नगराध्यक्षा पूजा कर्पे यांच्या कार्यकालात वाढ झाली आहे.
अभी वेंगुर्लेकर यांना लॉटरी
वेंगुर्ले उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन मनसेचे निलंबित नगरसेवक अभी वेंगुर्लेकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे वेंगुर्ले पालिकेत सतरा पैकी बारा सदस्य असतानादेखील मनसेचे नगरसेवक अभी वेंगुर्लेकर यांना उपनगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वेंगुर्लेकर हे आपलेच असल्याचे जाहीर केले आहे.
राजन पोकळे बिनविरोध
सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड पार पडली. यात राजन पोकळे यांची निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर व अन्य नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.
पुढील नगराध्यक्षांना दोनच वर्षांचा कालावधी
सावंतवाडी, वेंगुर्ला व मालवण या नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांची मुदत अडीच वर्षांची आहे. या नगराध्यक्षपदाचा कालावधी हा जूनमध्ये संपत होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नगरपरिषदांच्या निवडणुकीत सहा महिने वाढ झाल्याने त्यांना आता डिसेंबरपर्यंत पदावर राहता येणार आहे. त्यामुळे पुढील नगराध्यक्षांना मात्र दोनच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Expansion of municipal corporation; Suburban Selection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.