ग्रामस्थांना अष्टविनायक दर्शनाची अनुभूती
By admin | Published: September 11, 2016 12:12 AM2016-09-11T00:12:16+5:302016-09-11T00:25:29+5:30
अष्टविनायकांचे भावनिक वातावरणात विसर्जन : मळेवाडमधील कुलदेवता प्रासादिक मंडळाचा उपक्रम
सुनील गोवेकर -- आरोंदा --गणेश चतुर्थीला घरोघरी विराजमान होणाऱ्या गणेशमूर्तीमध्ये श्रींच्या आठ रूपांची निर्मिती करून गावातच अष्टविनायकाचे दर्शन घडविणाऱ्या मळेवाडमधील अष्टविनायकांचे विसर्जन भावनिक वातावरणात विसर्जन झाले. श्री कुलदेवता प्रासादिक मंडळाने राबविलेला हा उपक्रम राज्यात अनोखा समजला जात आहे. गणेशाच्या या आठही रूपांचे दर्शन जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी घेत प्रति अष्टविनायक यात्रेची अनुभूती मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या.
केवळ भारतातच नाही, तर जगभरात गणेशाचे भक्तीमय पूजन केले जाते. बुद्धीची देवता असणाऱ्या गणेशाची अनेक ठिकाणी मंदिरे वसली आहेत. भारतातील (महाराष्ट्रातील) गणेशाची आठ स्थाने अशा स्थानांपैकीच अत्यंत महत्त्वाची मानली जातात.
‘स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धीदम।
बल्लाळं मुरूडं विनायक मढं चिंतामणी थेवरम्।।
लेण्याद्री गिरिजात्मजं सुवरदम् विघ्नेश्वरं ओझरम।
ग्रामो रांजण संस्थितं गणपती कुर्यात सदा मंगलम्।।’
या प्रस्तुत श्लोकामध्ये शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा दिसते. पहिले स्थान मोरगावचा मोरेश्वर, दुसरे सिध्दटेकचा सिध्दिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, ओझरचा विघ्नेश्वर, रांजणगावचा महागणपती हे आठवे स्थान. महागणपतीच्या दर्शनानंतर पुन्हा मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घ्यायचे आणि यात्रा पूर्ण करायची, अशी भाविकांची श्रध्दा आहे. ही यात्रा पूर्ण करण्यासाठी कंपन्या यात्रा, सहलींचे आयोजन करतात. त्याला पैसाही मोजावा लागतो. काही भक्तांची इच्छा असूनही अष्टविनायक यात्रा करता येत नाही. अशा भक्तांना अष्टविनायकाचे दर्शन घेता यावे, या हेतूने सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील कुलदेवता प्रासादिक भजन मंडळाने यावर्षी भाद्रपद शुध्द चतुर्थीला आगळ्यावेगळ्या पध्दतीने अष्टविनायकाचे दर्शन घडविले. हा उपक्रम राबवून गणेशभक्तांना अष्टविनायकाचे शास्त्रोक्त दर्शन उपलब्ध करून देण्याचा संकल्प यशस्वी झाला आहे. मळेवाड देऊळवाडी येथील कुलदेवता प्रासादिक भजन मंडळाचा हा स्तुत्य उपक्रम यंदाच्या गणेशोत्सवात जिल्ह्यात उल्लेखनीय ठरला आहे.
मळेवाड (ता. सावंतवाडी) येथील देऊळवाडीत कुलदेवता प्रासादिक मंडळाच्या सदस्यांच्या आठ घरांत आठ विनायकाच्या अवतारमूर्ती विराजमान झाल्या. शिवाय सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून लेक वाचवा, व्यसनमुक्ती, वसुंधरा वाचवा, स्वच्छता अभियान, स्त्री अत्याचार यासारख्या विषयांवर आधारीत देखाव्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे.
ग्रामस्थांच्या घरी अष्टविनायकाचे वास्तव्य
अष्टविनायक रूपे मोरगावचा मोरेश्वर - लक्ष्मण लाडू मुळीक, सिध्दटेकचा सिध्देश्वर - गणेश केशव नाईक, पालीचा बल्लाळेश्वर-नारायण नाईक, महडचा वरदविनायक-वामन नाईक, थेऊरचा चिंतामणी-दत्ताराम नाईक, लेण्याद्रीचा गिरिजात्मक- शंकर नाईक, ओझरचा विघ्नेश्वर- वामन माळकर, रांजणगावचा महागणपती विकास नाईक यांच्या निवासस्थानी विराजमान झाले होते.
अष्टविनायकाचा हा अभिनव उपक्रम जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविण्यात आला. त्यामुळे मळेवाड दशक्रोशीसह जिल्ह्यातील आप्तेष्ट, नातेवाईक आणि भाविक आदींनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. सर्वसामान्यांना अष्टविनायकाचे दर्शन, यात्रा करण्याच्या हेतूनेच हा उपक्रम राबविण्यात आला.
- विकास नाईक, अध्यक्ष