मुलांना मिळाली शाळाबाहेरच्या जगाची अनुभूती
By admin | Published: May 4, 2016 11:14 PM2016-05-04T23:14:09+5:302016-05-04T23:47:14+5:30
‘धमाल शाळा’ उपक्रमाचा सावंतवाडीत समारोप : पहिल्यांच उपक्रमाला विद्यार्थी-पालकांचा उत्तम प्रतिसाद, व्यक्तिमत्व विकासासह उद्योगाभिमुख प्रयोगातून सामजिक भान
राजन वर्धन-- सावंतवाडी --विद्यार्थ्यांचे शिक्षण हे बहुतांशी शिक्षकावरच अवलंबून असते. पण सध्याच्या शिक्षकाला शासनाची असणारी दैनंदिन कामे आणि तीही आॅनलाईन करावी लागत असल्याने शिक्षणापासून शिक्षकच दुरावत चालल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या दर्जेदार व सर्वांगीण शिक्षणासाठी पालकांची धडपड सुरू असते. ही गरज ओळखून सावंतवाडीमध्ये ‘धम्माल शाळा’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे मुलांना शाळा बाहेरच्या जगाची नवी अनुभूती मिळण्यास मोठी मदत झाली. तर सावंतवाडी शहरात राबविलेल्या या वेगळ्या व पहिल्याच उपक्रमाला शहरातून २५ मुलांचा सहभाग मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समविचारी व पुरोगामी विचार मानणाऱ्या सर्व-संस्था संघटनांच्या माध्यमातून सावंतवाडीत गतवर्षी ‘आम्ही भारतीय’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील पन्नास मान्यवरांचा समावेश आहे. या संस्थेमार्फत शालेय मुलांसाठी व तरूणाईसाठी सामाजिक जाणीवेची, बंधुभावाची व सामाजिक भानाची प्रचिती येण्याच्या हेतूने विविध कार्यक्रम राबविण्याचे कार्य केले जाते.
प्रासंगिक उपक्रमाबरोबरच भवितव्याच्या दृष्टीने विविध व्याख्याने, सामाजिक बदलाच्या विविध घटनांवर चर्चात्मक वाद-संवादाचे कार्यक्रम घेतले जातात.
यंदा या संस्थेमार्फत शालेय मुलांच्या सुटीच्या काळात ‘धमाल शाळा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. धम्माल शाळा या उपक्रमांतर्गत मुलांना कारिवडे-सावंतवाडी येथे निवासाची सोय करून विविध शारीरिक व बौध्दिक खेळ, गाणी, वैज्ञानिक प्रयोग, गणितातील गमती-जमती, पक्षीनिरीक्षण, आकाशदर्शन, हस्तकला, पर्यावरण संवर्धन अशा मूल्यवर्धक घटकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
उपक्रमाचे आयोजन अॅड. संदीप निंबाळकर, सोनाली निंबाळकर, राजश्री टिपणीस, राहुल टिपणीस व प्रविण बांदेकर व हरिहर वाटवे यांनी केले होते. उपक्रमाचे संयोजक म्हणून नीला आपटे (सावंतवाडी), प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रज्ञा अभ्यंकर (कोल्हापूर) व श्रध्दा भारतीय (गोवा) यांनी काम केले.
या उपक्रमाला तामिळनाडू येथील ‘मरूदम’ या प्रयोगशील शाळेमध्ये काम करणारे कार्तिक व माया, केरळचे पत्रकार अजयकु मार, शिक्षिका मनीषा गुरव, सामाजिक कार्यकर्त्या अर्पिता मुंबरकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नृत्यांगना गौरी कुलकर्णी या मान्यवरांनी भेटी देऊन मुलांशी संवाद साधला. तर अॅड. देवदत्त परूळेकर, मंगल परूळेकर, विजय फापर्तेकर, प्रा. सुभाष गोवेकर, सोनाली ओगले, आनंद देवळी, प्रा. स्मिता खानोलकर, प्रा. विजया सावंत, शिरीष बांदेकर आदी मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेबाहेरच्या जगाची अनुभूती मुलांना देणारी, मुलांचे भावविश्व समृध्द करणारी केंद्रे स्थापन होतील. तसेच आपला परिसर, पर्यावरण, समाज, स्वावलंबन या विषयीचे भान येऊन बांधिलकीची भावना निर्माण होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कारिवडे येथील जयश्री व आप्पाजी गावडे यांनी आपले राहते घर व परिसर आणि इतर सर्व सुविधा य उपक्रमासाठी उपलब्ध करून दिल्या. मुलांच्या गुणवत्ता विकासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल गावडे यांनीही धन्यवाद मानले.
धमाल शाळा हा उपक्रम तसा जिल्ह्यामध्ये प्रथमच राबविण्यात आला. यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यात आला. मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा बाह्य जगातील वास्तव ज्ञानाची अत्यंत गरज आहे. त्यामुळेच या उपक्रमांतर्गत उद्योगाभिमुख, रोजगाराभिमुख लघु प्रयोग राबविण्यात आले. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार वाढविण्याचा मानस आहे.
- नीला आपटे, महिला कार्यकर्त्या
शिक्षणाचा विचार करता विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात शालेय मुलांचे शिक्षणही गतीमान झाले आहे. झटपट शिक्षण व झटपट रिझल्ट अशा प्रकारच्या शिक्षणाला सामाजिक वास्तवाचे भान कमी पडते. धमाल शाळा या उपक्रमातून मुलांना शाळाबाह्य जगाचे किंबहुना समाजातील वास्तवाचे भान जाणवून देण्याचा उपक्रम ही गरज पूरी करणारा ठरला.
- प्रा. प्रवीण बांदेकर, प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी