बारसूमध्ये अज्ञातांनी स्फोटक साहित्य आणले, नीलेश राणेंचा गौप्यस्फोट
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 3, 2023 06:49 PM2023-05-03T18:49:08+5:302023-05-03T18:51:18+5:30
उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या स्फोटक साहित्याने काहीतरी अनुचित घटना घडविण्याच्या ‘त्या’ व्यक्तींचा मानस असल्याचेही सांगितले
सिंधुदुर्ग : ज्यांच्या जमिनी बारसूमध्ये नाहीत, जे कोकणातील नाहीत अशा व्यक्ती बारसू परिसरात फिरताना दिसून येत आहेत. या माणसांनी जिलेटिन स्टिकसारखी स्फोटक साहित्य बारसूमध्ये आणल्याचे सांगत ६ मे रोजी येथे होत असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या स्फोटक साहित्याने काहीतरी अनुचित घटना घडविण्याच्या ‘त्या’ व्यक्तींचा मानस असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
तसेच याबाबत ५ तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रत्नागिरी पोलिस अधीक्षक यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते.
नीलेश राणे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून वाद प्रतिवाद होत आहेत. मात्र, त्याचा अनुचित फायदा घेण्यासाठी काही माणसे जिल्ह्यात दाखल झाली आहेत. ६ मे रोजी बारसूमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आहे. याठिकाणी नागरिकांची गर्दी असणार आहे. त्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन या स्फोटक साहित्याने काही तरी अनुचित घटना घडविण्याच्या त्या व्यक्तींचा मानस आहे. असे स्फोटक साहित्य आणण्यामागे कोणता कट आहे का, याबाबत पोलिस यंत्रणेने तपास करावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
आधी त्यांनी बारसूमध्ये जावून दाखवावे
आमदार राजन साळवी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी दोन हात करण्याचे दिलेल्या आव्हानाबाबत नीलेश राणे म्हणाले, राजन साळवी यांनी अगोदर बारसूमध्ये जावून दाखवावे मगच त्यांनी आमच्याशी दोन हात करण्याची भाषा करावी.
...तर आम्हीही समर्थनार्थ मोर्चा काढू
बारसूमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेऊन विरोध करणार असतील तर आम्हीही या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा काढू, असेही नीलेश राणे यांनी सांगितले.