कोकणात जांभळाच्या विक्रीबरोबर निर्यात वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 06:18 PM2018-05-20T18:18:38+5:302018-05-20T18:18:38+5:30
मे महिन्याच्या ऊन-पावसाच्या दिवसांत खाण्यापिण्यात रेलचेल असते ती कोकणच्या रानमेव्याची. जांभूळ हा रानमेव्यातील महत्त्वाचा घटक आहे. येथील पर्यटनाचा आनंद लुटणारे देशी व विदेशी पर्यटक आणि मुंबई-पुणे येथून गावाकडे येणारे चाकरमानी सध्या काळ्याभोर, टपो-या, रसरशीत जांभळाची चव चाखत आहेत. जांभळाची विक्री व निर्यात वाढली आहे. जांभळाला मिळणारा दरही समाधानकारक असल्याने विक्रेत्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
- बाळकृष्ण सातार्डेकर
सिंधुदुर्ग - मे महिन्याच्या ऊन-पावसाच्या दिवसांत खाण्यापिण्यात रेलचेल असते ती कोकणच्या रानमेव्याची. जांभूळ हा रानमेव्यातील महत्त्वाचा घटक आहे. येथील पर्यटनाचा आनंद लुटणारे देशी व विदेशी पर्यटक आणि मुंबई-पुणे येथून गावाकडे येणारे चाकरमानी सध्या काळ्याभोर, टपो-या, रसरशीत जांभळाची चव चाखत आहेत. जांभळाची विक्री व निर्यात वाढली आहे. जांभळाला मिळणारा दरही समाधानकारक असल्याने विक्रेत्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
काळे, टपोरे रसरशीत जांभूळ हे तसे दुर्लक्षित फळ. पण या जांभळाचा वापर मधुमेहाच्या औषधासाठी केला जातो. तसेच या फळापासून उत्कृष्ट दर्जाचे मद्यही तयार केले जाते. जांभळाचा रस काढून ज्यूस, सरबत, जेली तसेच आयुर्वेदिक औषधासाठी त्याचा वापर केला जातो. जांभळाच्या बिया आयुर्वेदात अधिक उपयुक्त मानल्या जातात. जांभळाच्या रसाला तसेच सुकविलेल्या बिया व भुकटीला (पावडर) औषधी गुणधर्म आहेत.
जांभूळ सेवन केल्याने शरीरातील रक्ताच्या शुद्धिकरणास मदत होते. जांभूळ उत्तम पाचक असल्याने पचनशक्ती वाढविण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो.
पूर्वी जांभूळ झाडाचा वापर रेल्वेमार्ग तयार करताना खाली आधार म्हणून त्याच्या खोडाचा वापर केला जात असे. तसेच खेड्यापाड्यातील नवीन विहिरी बांधताना झाडाचा गोल आकाराचा लाकडी सांगाडा बनवून विहिरीत तळाकडील भागात घातला जातो.
तसेच घराच्या छपरासाठी वासे, रिप, पाशीट कोन काढून छप्पर बनविले जाते. हे फळ कफ व पित्त विकारात उत्तम औषध आहे. अतिसारनाशक व शीतकारक या मुख्य गुणामुळे मलप्रवृत्त करणारे फळ म्हणून जांभळाकडे पाहिले जाते. त्याचप्रमाणे दमा, अतिसार, रक्तदोष, व्रण यामध्ये जांभूळ गुणकारी असून पोटातील कृमीनाशक म्हणून जांभळाचा वापर होतो.
इतर फळांप्रमाणे जांभळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह, हृदय, यकृताच्या त्रासापासून बरे होण्यासाठी तसेच त्वचेचा दाह कमी करणे, रक्तस्त्राव थांबविणे, तोंडातील रक्तस्त्राव थांबविण्यासाठी जांभळाच्या पाल्याचा रस काढून गुळण्या करतात.
तारूण्यपिटिका आल्यास जांभळाच्या बिया पाण्यात उगाळून तो लेप उगाळून लावल्यास त्या निघून जातात. तसेच गावातील वैद्य गावठी औषधांमध्ये जांभळाच्या सालीचा रस काढून वापर करतात.
आयुर्वेदातही वापर
जांभूळ या फळामध्ये २१.७२ टक्के खनिजे, २.५ टक्के प्रथिने, ०.४१ टक्के चुना, ०.१७ टक्के स्फु रद, १९ टक्के टॅनिन, १८.५ टक्के तंतूमय पदार्थ असतात. या फळाचा खाण्यायोग्य भाग ५० ते ९० टक्के असून, यात विद्राव्य घटक १० ते १८ टक्के व आम्लता ०.४१ ते १.२५ इतकी सामावलेली असते. त्यामुळे हे बहुपयोगी, गुणकारी फळ आयुर्वेदात वापरले जाते.
मजुरांची कसरत
जांभळाचे झाड बाहेरून मजबूत असले तरी आतून फारच लवचिक असते. कमी वजनानेही या झाडाच्या फांद्या मोडू शकतात. त्यामुळे जांभळाची फळे काढताना मजुरांना जीव मुठीत धरून फारच सतर्कतेने काम करावे लागते.
शासनाने जांभूळ शेतीसाठी स्थानिक ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे. मदर इंडियाच्या माध्यमातून येथे मद्यार्क व आयुर्वेदिक प्रकल्प आणल्यास जांभूळ शेतीला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे उत्पादक आणि मजूर वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल.
- प्रसाद शांताराम रेडकर, रेडी म्हारतळेवाडी
जांभळाची फळे काढण्याचे काम अत्यंत जोखमीचे असले तरी रोजगार देणारे आहे. या कामामुळे मे महिन्यात चांगला रोजगार मिळतो. शासनाने चांगली बाजारपेठ मिळवून दिल्यास हा व्यवसाय वाढून पर्यायाने मजुरांना रोजगार प्राप्त होईल.
- नंदकुमार पांडजी, मजूर