आंबा कॅनिंगमुळे बागायतदारांची पिळवणूक, किलोला २0 रूपयांचा माफक दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:55 AM2020-05-09T10:55:16+5:302020-05-09T10:55:59+5:30
देवगड तालुक्यामध्ये आंबा कॅनिंग व्यवसायाला सुरूवात झाली. मात्र कॅनिंगचा प्रति किलो २० रुपये माफक दराने घेत असलेला आंबा हा बागायतदारांची पिळवणूक करणारा आहे असे बागायतदारांमधून बोलले जात आहे. आंबा बागायतदारांची पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.
देवगड : तालुक्यामध्ये आंबा कॅनिंग व्यवसायाला सुरूवात झाली. मात्र कॅनिंगचा प्रति किलो २० रुपये माफक दराने घेत असलेला आंबा हा बागायतदारांची पिळवणूक करणारा आहे असे बागायतदारांमधून बोलले जात आहे. आंबा बागायतदारांची पिळवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.
कृषी विभागाने आंबा कॅनिंगचा भाव ठरवून द्यावा, अशी मागणी बागायतदारांमधून केली जात आहे. या कंपन्या पूर्णपणे येथील बागायतदारांची पिळवणूक करीत आहे. ही पिळवणूक थांबविण्यासाठी शासनाने कृषी विभागाला आंबा कॅनिंगचा भाव ठरविण्याचे अधिकार दिले तर आंबा कॅनिंग कंपन्यांची मक्तेदार संपुष्टात येईल.
याचा फायदा बागायतदारांना होऊ शकतो. या स्टॉलवर २० रुपये प्रति किलोने आंबा खरेदी केला जात आहे. हा भाव यावर्षीचा कमी उत्पन्नाचा विचार केला तर किमान ३५ रुपये प्रति किलोने शेतकऱ्यांना किंवा बागायतदारांना मिळणे आवश्यक होते.
जून महिन्यापासून मे महिन्यापर्यंत अशी वर्षभर आंबा कलमांची मशागत करावी लागते. कलमांना मोहोर आल्यानंतर अनेक किटकनाशक फवारणीची अनेक महागडी औषधे वापरावी लागतात व अशा परिस्थितीमध्ये २० रुपये प्रति किलो बागायतदारांकडून आंबा खरेदी केली जात आहे.
यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था बागायतदारांची होण्यास आंबा कॅनिंग कंपन्याच जबाबदार असतात. मात्र कोकणातील आंबा बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणताही राजकीय नेतृत्व नसल्याने बागायतदार एकाकी पडत आहेत. यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना न्याय मिळण्यासाठी राजकीय नेत्यांनी राजू शेट्टी बनने आवश्यक आहे.
गतवर्षीच्या तुलनेने आंबा कॅनिंग व्यवसाय ५0 टक्क्याहून कमी
विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते तेथील पिकांना हमीभाव मिळण्यासाठी उग्र आंदोलने व विधानसभेत आवाज उठवित असताना दिसत आहेत. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आंबा कॅनिंग व्यवसाय ५0 टक्केहून कमी असणार असल्याचे व्यावसायिकांमधून सांगण्यात येत आहे.
यावर्षी आंबा पीक कमी असल्याने याचा परिणाम कॅनिंग व्यवसायावर झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत हजारो टन आंबा कॅनिंगसाठी जात होता. मात्र यावर्षी अल्प प्रमाणात आंबा असल्याने कॅनिंग व्यवसाय कुर्मगतीने सुरू झाला आहे.
हा व्यवसाय जेमतेम पंधरा दिवसच चालणार आहे व या कालावधीमध्ये आंबा कॅनिंगला आंबा कमीच असणार आहे असे असताना आंबा कॅनिंगला २0 रुपये माफक दर का? असा प्रश्न बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.