वसुलीपेक्षा कागदी घोडे जादा

By Admin | Published: April 8, 2015 09:33 PM2015-04-08T21:33:47+5:302015-04-08T23:54:06+5:30

महसूल विभाग : अधिकाऱ्याच्या मनमानीचा शासनाच्या तिजोरीलाही फटका

Extracurricular books | वसुलीपेक्षा कागदी घोडे जादा

वसुलीपेक्षा कागदी घोडे जादा

googlenewsNext

राजापूर : येथील महसूल विभागातील वामनमूर्ती वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य जनतेबरोबरच आता शासनाच्या तिजोरीलाही मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. गेल्या वर्षभराच्या काळात लाखो रुपयांची दंडात्मक कारवाईची प्रकरणे वसुलीअभावी पडून आहेत.
अपिलात गेलेल्या दंडात्मक कारवाईच्या प्रकरणांचे निकाल वेळेवर न दिल्याने व काही प्रकरणांमध्ये बड्या धेंडाना आपल्या अर्थपूर्ण व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात सूट दिल्याने याचा फटका शासकीय उत्पन्नावर झाला आहे. या कार्यालयाची व त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजापूर महसूल विभागातील तो अधिकारी व त्याच्या त्रिकुटाच्या कारनाम्यांची चर्चा सर्वत्र खुलेआमपणे सुरु आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेबरोबरच आता महसुली कर्मचाऱ्यांनाही बसू लागल्यामुळे त्यांच्या विरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. या त्रिकुटातल्या गोऱ्या अधिकाऱ्याने आपल्याच कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या नाहक खोट्या तक्रारी करायला सुरुवात केल्याने महसूल विभागातील कर्मचारी चांगलेच हवालदिल झाले आहेत.
तालुक्याच्या ग्रामीण भागात झालेले अनधिकृत उत्खनन व त्यावर झालेली दंडात्मक कारवाई वसुलीअभावी कागदी घोेडे नाचवणारीच ठरली आहे. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईचे अहवाल पाठवल्यानंतर तालुका महसूल विभागाकडून संबधितांना दंडात्मक रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्याच्या नोटीसा पाठवल्या जात असल्या तरी या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यातील काही प्रकरणांना स्थगिती देऊन, तर काही प्रकरणांवर अद्याप काहीच कारवाई केली नसल्याचे दिसून येते.
मध्यंतरीच्या कालावधीत उत्खननाच्या परवानगीसाठी काही प्रस्तावही दाखल झाले होते. मात्र, या वरिष्ठ अधिकाऱ्याने विविध प्रकारच्या दाखल्यांप्रमाणेच त्या प्रकरणांवरही अद्याप सह्या न केल्याने ती प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ स्वत:च्या हितासाठी आपल्याच कर्मचाऱ्यांवर गोऱ्या साहेबाच्या सांगण्यावरुन कारवाई करण्यात हा वामनमूर्ती वरिष्ठ अधिकारी धन्यता मानत असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या अधिकाऱ्याची राजापूर तालुक्यातून त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)


अनेक प्रकरणे उजेडात
महसूल विभागातील कारनाम्याची अनेक प्रकरणे आता पुढे येत आहेत. राजापूरचा महसूल विभाग आणि अर्थपूर्ण कारभार हे आता समीकरण होऊ लागले आहे. काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण विभागच बदनाम होत असून, त्यामध्ये सर्वच महसूल कर्मचारीही भरडले जात असल्याची ओरड कर्मचाऱ्यांमधूनच होत आहे. लाचखोर अधिकाऱ्यांची तालुक्यातून बदली करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Extracurricular books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.