जैवविविधतेत भर; सिंधुदुर्गमध्ये सापडला अति दुर्मीळ पोवळा साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 06:53 PM2021-11-23T18:53:07+5:302021-11-23T18:55:33+5:30
विषारी प्रजातींमध्ये मोडला जाणारा हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मण्यारसारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते.
महादेव भिसे
आंबोली : पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्गची जैवविविधता ही अतिशय श्रीमंत समजली जाते आणि याच श्रीमंतीची अनेक उदाहरणे आपल्यासमोर नेहमी आपण बघत आलो आहोत. काळा बिबटा असेल किंवा पट्टेरी वाघांचे अस्तित्व असेल त्यात भर म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील महेश राऊळ यांना कॅस्ट्रोकोरल स्नेक ज्याला मराठीमध्ये पोवळा साप असे म्हटले जाते, ही अतिशय दुर्मीळ सापाची प्रजाती आढळून आली आहे.
महेश राऊळ हे गेली अनेक वर्षे भरवस्तीत आलेले साप जंगलात सोडतात ते परिसरामध्ये सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत. त्याशिवाय भटके प्राणी असतील किंवा वन्यप्राणी, जखमी प्राणी यांच्यावर उपचार करण्यासाठीसुद्धा महेश राऊळ नेहमी अग्रस्थानी असतात. असेच काम करत असताना त्यांना घराच्या शेजारी हा साप आढळून आला.
सिंधुदुर्गमध्ये दुसऱ्यांदा नोंद
साप आढळून येताच त्यांनी तत्काळ आपले सहकारी वैभव अमृसकर आणि कोकण वाइल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे यांना संपर्क केला. या तिघांनी शहानिशा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून, अतिशय दुर्मीळ असा आहे. हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र भटकत असतात किंवा हा साप दिसावा म्हणून संशोधनही केले जाते. छायाचित्रकारांनाही या सापाचे फोटो काढणे म्हणजे पर्वणीच असते. सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली असल्याचे वन्यप्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांनी सांगितले.
असा असतो पोवळा साप....
हेमंत ओगले यांनी या सापाचे संशोधन केले आहे. विषारी प्रजातींमध्ये मोडला जाणारा हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मण्यारसारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते. दगडाखाली आणि पालापाचोळ्याखाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष्य छोटे बेडूक, सरडे, पाली, गांडूळ इत्यादी आहे. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. करंगळी एवढा जाड असतो. याच्या बरोबर डोक्यावर भगवी जाड रेषा असते. हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्या जवळ येऊ नका, असा इशारा देत असतो.
सिंधुदुर्गची जैवविविधता नकाशावर झळकणार
हा साप महेश राऊळ यांना आढळल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीवरक्षक काका भिसे यांच्याशीही संपर्क केला. या सापाविषयी माहिती घेतली असता महेश राऊळ, अनिल गावडे व वैभव अमृतकर यांनी या सापाची नोंद त्यांच्या रजिस्टरमध्ये केली असून, लवकरच या सापाच्या अधिवासाबद्दल व सापाच्या आढळाबाबत छोटेखानी शोधनिबंध लिहिणार असल्याचे सांगितले आहे. या सापाच्या आढळामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याची जैवविविधता जगाच्या समोर प्रकाशझोतात येणार असल्याचे यावेळी फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी सांगितले.