स्कुबा डायव्हींगमधून देवगडचा चेहरा बदलणार
By admin | Published: December 20, 2015 11:17 PM2015-12-20T23:17:01+5:302015-12-21T00:30:40+5:30
नीतेश राणे : मिठमुंबरी येथील भूमिपूजन सोहळ्यात प्रतिपादन
कुणकेश्वर : देवगडवासीयांच्या विरोधात जाऊन कुठलाही प्रकल्प देवगडमध्ये साकारणार नाही. मिठमुंबरी येथे स्कुबा डायव्हींग सेंटर साकार करून देवगडचा चेहरा बदलण्याचे पहिले पाऊल टाकले आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाचा विषयच मुळात या सेनाभाजप सरकारला समजला नसल्यामुळे सी वर्ल्डचा आता फिश टँक झाला असल्याचे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले.
मिठमुंबरी येथे देवगड मरिन अॅडव्हेंचर स्कुबा डायव्हींग सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सतिश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर, बालकल्याण सभापती अंकुश जाधव, सभापती मनोज सारंग, तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, बाळा खडपे, प्र्रणाली माने, मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गावकर, अमर गावकर, वैभव दांडेकर, सुधीर जोशी, चारूदत्त सोमन आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, स्कूबा डायव्हींग सेंटर निर्माण करून मिठमुंबरी किनारपट्टीवर अनेक रोजगाराच्या संधी स्थानिक तरूणांना उपलब्ध होणार आहेत. मालवणसारख्या ठिकाणी पर्यटकांना विविध मनोरंजनाची ठिकाणे असल्यामुळे तेथे पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तोच दृष्टीकोन लक्षात ठेवून देवगडमध्ये असे पर्यटन सेंटर आणून देवगडचा कायापालट करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवला होता. मात्र, पर्यटन वाढीसाठी लागणाऱ्या जोडधंद्याचा अभ्यास करण्यासाठी आतापासून नागरिकांनी कामाला लागले पाहिजे. मिठमुंबरी येथे साकारत असलेले स्कूबा डायव्हींग सेंटर हे पारदर्शकपणे लोकांसमोर सांगितले तर हा प्रकल्प साकारताना कुठलीही अडचण आम्हाला निर्माण होणार नाही.
देवगडवासीयांसाठी सर्व काही मीच करणार असे नाही. कुठल्याही चांगल्या कामाचे पहिले पाऊल मी टाकले असले तरी पुढील पाच पावले देवगडवासीयांनी टाकायची आहेत. यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ सिंंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून मिळत असेल तर तुमची जिद्द, चिकाटी दाखवून तूम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता. तसेच महिला बचतगटांनी देखील एक पाऊल पुढे जाऊन आता न्याहारी निवास योजनेमध्ये पर्यटकांना आकर्षित करून आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आतापासून पुढाकार घेणे गरजेचे आहे.
सावंत म्हणाले की, सिंंधुदुर्ग जिल्हा १९९८ साली पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचे काम केले आहे. स्कुबा डायव्हींग सेंटरमध्ये जमीन मालकांनाच भागीदार करून जिल्ह्यामध्ये नवीन इतिहास आमदार राणे यांनी निर्माण केला आहे. मालवणमध्ये विकासाला विरोध केला जातो, मात्र देवगडमध्ये विकासाला साथ दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मिठमुंबरी येथे स्कुबा डायव्हींग सेंटरसाठी अमर गावकर यांनी जागा दिली. सरपंच बाळकृष्ण गावकर, चारूदत्त सोमण, सुधीर जोशी यांनी विचार मांडले तर वैभव दांडेकर यांनी मिठमुंबरी येथे साकारत असलेल्या स्कूबा डायव्हींग सेंटरविषयी माहिती दिली. प्रास्ताविक पंकज सावर्डेकर यांनी, सूत्रसंचालन मिलिंंद कुलकर्णी व आभार प्रकाश राणे यांनी मानले. (वार्ताहर)