फिश मार्केटला सुविधा देणार
By Admin | Published: March 3, 2015 07:59 PM2015-03-03T19:59:51+5:302015-03-03T21:32:10+5:30
विश्वास पाटील : सावंतवाडी फिश मार्केटला भेट
सावंतवाडी : हैदराबाद फिशरिंगप्रमाणे सावंतवाडीतील फिश मार्केटला सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे फिश मार्केटची इमारत सुुंदरवाडीच्या वैभवात भर घालणारी ठरेल, असे मत ‘पानिपत’कार तथा मत्स्यविकास महामंडळाचे व्यवस्थापक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. पाटील यांनी मंगळवारी सावंतवाडी नगरपरिषदेच्या फिश मार्केटला भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मुख्याध्याधिकारी विजयकुमार द्वासे, प्रा. प्रवीण बांदेकर उपस्थित होते. पाटील म्हणाले, सुंदरवाडी नावाप्रमाणेच सुंदर आहे. येथील निसर्ग व वास्तूही तितक्याच सुंदर असून, जन्म घेताना मला पर्याय मिळाल्यास माझा जन्म याच सुंदरवाडीच्या लाल मातीत व्हावा, असा वर मागेन. सावंतवाडीतील मच्छिमार्केटचे काम पूर्णत्वास आले आहे. प्रा. प्रवीण बांदेकर म्हणाले, दर्जेदार लेखन व कादंबरीकार म्हणून पाटील यांची ओळख असून, ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. या सुंदरवाडीस पुन्हा भेट देऊन आपल्या साहित्याचे मूल्यमापन करण्याची संधी द्यावी, असे सांगितले. (वार्ताहर)
संस्कृती घडविण्यात मराठी शूरवीरांचा वाटा
कथा, कादंबरी लिहिणे ही माझी आवड असून, जनसेवा हाच यामागील उद्देश आहे. महाराष्ट्राची संस्कृती घडविण्यात या लाल मातीतील शूरवीर मराठ्यांचा तितकाच वाटा आहे, असे त्यांनी सांगितले. बबन साळगावकर यांनी, अनेक कवीवर्य, लेखक, साहित्यिक या सुंदरवाडी नगरीत घडले. या सर्वांना सावंतवाडी नगरीने सन्मानित केले आहे. विश्वास पाटील यांचाही सत्कार करताना अतिशय आनंद होत आहे, असे सांगितले.