फडणवीस, गडकरी आज रत्नागिरीत
By admin | Published: January 28, 2016 11:52 PM2016-01-28T23:52:41+5:302016-01-29T00:37:12+5:30
चौपदरीकरणाच्या भूमिपूजनामुळे कोकणवासीयांचे गेल्या दोन दशकांपासूनचे स्वप्न साकारण्यास सुरुवात
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या निवळी (रत्नागिरी) येथे होणाऱ्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनासह अन्य कार्यक्रमांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. चौपदरीकरणाच्या भूमिपूजनामुळे कोकणवासीयांचे गेल्या दोन दशकांपासूनचे स्वप्न साकारण्यास सुरुवात होणार आहे.
गडकरी व फडणवीस यांच्या उपस्थितीत निवळी येथे आज सकाळी १० वाजता महामार्ग चौपदरीकरणाचे भूमिपूजन होणार आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप व मित्रपक्षांचे सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणाच्या विषयाला गती दिली होती. त्यानुसार तत्परतेने चौपदरीकरणाबाबतचे अनेक निर्णय घेतले. त्यासाठी ६ हजार कोटींच्या निधीचीही तरतूद केली. आता त्यांच्याच हस्ते निवळी येथील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर महामार्गावर या चौपदरीकरणाचे भूमिपूजन होत आहे. राज्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याने यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.
भूमिपूजनानंतर दुपारी १.३0 वाजता मंत्री गडकरी यांच्या हस्ते रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन होणार आहे. त्यांच्याच हस्ते या इमारतीचे भूमिपूजन २०१४ मध्ये झाले होते. त्यानंतर २.३० वाजता ते रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)