जैतापूरसारखे प्रकल्प विकासाला घातक
By admin | Published: March 29, 2015 09:20 PM2015-03-29T21:20:35+5:302015-03-30T00:28:14+5:30
विनायक राऊत : दोडामार्ग महाविद्यालयात मार्गदर्शन
कसई दोडामार्ग : पश्चिम घाटाचे रक्षण करण्यासाठी ध्येयवेडी माणसे, शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे कोकणाला त्याचा फटका बसत आहे. जैतापूरसारखा घातक प्रकल्प कोकणाच्या विकासाला घातक आहे. असे असताना शासनकर्ते पश्चिम घाटाचे संवर्धन करण्यासाठी कमी पडत आहेत, असे मत खासदार विनायक राऊत यांनी दोडामार्ग महाविद्यालयात आयोजित ‘पश्चिम घाट- जागतिक वारसा’ याविषयी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. दोडामार्ग महाविद्यालयात ‘पश्चिम घाट-जागतिक वारसा’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी केले होते. यावेळी खासदार राऊत बोलत होते. व्यासपीठावर नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, प्राध्यापक डॉ. व्ही. ए. पाटील, उद्योजक विवेकानंद नाईक, सुजन कोरगावकर, सूर्यकांत परमेकर, डॉ. राजेंद्र केरकर आदींसह विविध विषयाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, पश्चिम घाटाचे रक्षण होणे आवश्यक आहे. घाट वाचला तर आपण वाचणार आहोत. माधव गाडगीळ यांचा अहवाल शासनाने स्वीकारणे आवश्यक होते. ते म्हणाले, ‘कोकणातील साधनसंपत्तीवरच व्यवसायांची निर्मिती झाल्यास कोकणाचा विकास होणार आहे. गौण खनिजावरील बंदी योग्य नाही. पर्यावरणाचे संतुलन टिकविणे गरजेचे आहे. हा उपक्रम स्तुत्य असून ही चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर मानवाची उत्क्रांती अवलंबून आहे.
समतोल ढासळल्यास त्याचे परिणाम मानवालाच भोगावे लागणार आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमीच तयार असते. जैतापूरसारख्या प्रकल्पांना विरोध होत नाही, हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. प्रास्ताविकात अभिजीत हेगशेट्ये यांनी, माधव गाडगीळ कस्तुरीरंगन यांचा अहवाल शासनाने स्वीकारणे आवश्यक होते. प्रदूषणकारी प्रकल्प कोकणातून हद्दपार करण्यासाठी जनतेने लढा देणे आवश्यक आहे. तरच नैसर्गिक साधनसंपत्ती वाचणार आहे, असे सांगितले. (वार्ताहर)