बनावट मद्यनिर्मिती, रॅकेटचा पर्दाफाश
By admin | Published: March 6, 2016 10:44 PM2016-03-06T22:44:42+5:302016-03-07T00:41:06+5:30
पाचजण अटकेत : सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
बांदा : राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मुंबई येथील भरारी पथकाने मडगाव-गोवा येथे कारवाई करत भेसळयुक्त व बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅकेटचा रविवारी पर्दाफाश केला. या बनावट मद्याची कोकण रेल्वेतून राजरोसपणे वाहतूक करत मुंबई व ठाणे परिसरात विक्रीकरण्यात येत होती. पथकाने या प्रकरणी मडगाव-गोवा येथे व्हिडिओ पार्लरवर छापा टाकून पाच लाख २७ हजार ८०० रुपये किमतीच्या बनावट दारूसह मद्याची निर्मिती करणाऱ्या पाच परप्रांतीय युवकांवर अटकेची कारवाई केली आहे. राज्य उत्पादन खात्याच्या पथकाने गोव्यात जाऊन मद्यनिर्मिती करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची ही पहिलीच घटना आहे.
गोवा हे बनावट व भेसळयुक्त मद्यनिर्मितीचे माहेरघर आहे. याठिकाणी छुप्या पद्धतीने मद्यनिर्मिती करून या मद्याची महाराष्ट्राच्या विविध भागात चढ्या भावाने विक्री करण्यात येते. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असून, पोलीस व उत्पादन खाते यांना संशय येऊ नये, यासाठी या रॅकेटकडून दारू वाहतुकीसाठी कोकण रेल्वेचा वापर करण्यात येत होता. आठवड्यातून ठरावीक दिवशी कोकण रेल्वेतून मडगाव येथून मुंबई येथे पांडे व जितू नामक व्यक्ती बनावट दारूची तस्करी करीत असल्याची माहिती उत्पादन शुल्क खात्याच्या मुंबई येथील भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. ४) ठाणे मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून दारू वाहतूक होत असल्याची पक्की खबर मिळाल्याने ठाणे येथे कारवाई करण्यात आली. यामध्ये चार बॉक्स ओल्ड बिल एक्स्ट्रा स्पेशल व्हिस्कीचे २२ हजार १०० रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला व दोघा आरोपींना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.
या आरोपींकडे कसून चौकशी केली असता, बनावट मद्यनिर्मिती ही मडगाव-गोवा येथे करण्यात येत असल्याचे माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार निरीक्षक सुभाष जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गोवा गाठले. गोवा पोलिसांच्या मदतीने तेथे सापळा रचला. संशय येऊ नये, यासाठी आरोपींनी याठिकाणी व्हिडिओ पार्लर सुरू असल्याचे पथकाला सांगितले. मात्र, पार्लरच्या मागील मोकळ्या जागेत बनावट दारूची निर्मिती करण्यात येत होती. पथकाने तेथील लक्ष्मण सुरेंद्र बहादूर थापा (वय २५, रा. आखी मडगाव रेल्वे स्टेशन, मूळ रा. नेपाळ), रवींद्र ऊर्फ अजय समजित मिश्रा (३५, रा. शिवआशीर्वाद बिल्डिंग, साईनाथ नगर, नालासोपारा-ठाणे, मूळ रा. उत्तर प्रदेश), भवन मुरजी गांधी (३६, रा. मडगाव), जितेंद्रसिंग देवेंद्रसिंग (२५, रा. मडगाव, मूळ रा. मध्य प्रदेश), सनी नरेश राजपूत (२२, रा. मडगाव, मूळ रा. उत्तर प्रदेश) या आरोपींना अटक करण्यात आली. सर्व आरोपींना ठाणे येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)