वेर्लेत घरकुल योजनेत बनावट कागदपत्रे !
By admin | Published: December 19, 2014 09:50 PM2014-12-19T21:50:54+5:302014-12-19T23:31:14+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
सावंतवाडी : घरकुल योजनेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी भगवान विष्णू नाईक-जाधव
आणि सीताराम महादेव कदम या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरिता सदाशिव सोनू कदम (रा. वेर्ले-कदमवाडी) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी पत्र सादर केले आहे. सन २००७ मध्ये सीताराम महादेव कदम (वय ४५) याने सावंतवाडी पंचायत समिती येथे घरकुल योजनेखाली प्रस्ताव सादर केला होता. यासाठी विष्णू धोंडी नाईक (वय ८०) यांचे कुळ लागलेल्या देवस्थानच्या जमिनीचा लाभ घरकुलासाठी घेण्यात आला होता. यावेळी भगवान नाईक-जाधव याने विष्णू नाईक यांच्या नावाचा वापर करून प्रस्तावात त्यांचे वय ४० असल्याचे नमूद करून व आपला फोटो वापरून आपणच विष्णू नाईक असल्याचे भासवून संमतीपत्रावर स्वाक्षरी करून शासनाची फसवणूक केली होती. या प्रकरणात घरकुल लाभधारक सीताराम महादेव कदम यांच्यासाठी पुंडलिक तुकाराम कदम यांनी संबंधितांची ओळख असल्याची साक्ष नोंदविली आहे. या संपूर्ण प्रकरणात सीताराम महादेव कदम, भगवान विष्णू नाईक-जाधव, पुंडलिक तुकाराम कदम यांनी शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. या पत्राची प्रत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर आदींना दिली आहे. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे असून या एका प्रकरणात जरी कारवाई झाली तरी इतर प्रकरणांना चाप बसेल, अशी आशा सदाशिव कदम यांनी या निवेदनातून व्यक्त केली आहे.
(वार्ताहर)
यातील सीताराम महादेव कदम हे मृत असून अन्य दोघांवर शासकीय संमतीपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. जेणेकरून शासनाच्या झालेल्या फसवणुकीला चाप लागेल, अशी मागणी सदाशिव कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.