फेक न्यूज : सिंधुदुर्ग : तंत्रज्ञान वापराचे जितके फायदे तितकेच तोटे : दिलीप पांढरपट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:31 PM2018-08-02T14:31:17+5:302018-08-02T14:36:49+5:30
तंत्रज्ञान वापराचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे दुष्परिणामही भयावह आहेत. मजकूर पुढे पाठविताना दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी : तंत्रज्ञान वापराचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे दुष्परिणामही भयावह आहेत. मजकूर पुढे पाठविताना दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली येथील पत्रकार कक्षामध्ये फेक न्यूज व समाज माध्यम याविषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
या चर्चासत्रामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, सिंधुदुर्ग पोलीस सायबर सेलचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे आदींसह पत्रकार उपस्थित होते.
गुन्हेगार हे नवनवीन युक्त्या वापरून गुन्हे करीत असतात असे सांगून डॉ. पांढरपट्टे पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच त्याचा गैरफायदा घेण्याचे तंत्र गुन्हेगारांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे करत आहेत. तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेकवेळा खोटी माहिती, अफवा पसरवण्याची प्रकरणे घडत आहेत. एखादी चांगली माहिती पुढे पाठवावी. पण, समाजामध्ये भीती, तेढ निर्माण करणारी माहिती पुढे पाठवू नये. आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक मेसेजची खातरजमा करून मगच तो पुढे पाठवावा.
सध्या लोकांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिष्ट्वटरचे व्यसन जडल्याचे दिसते. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यातून तरुण पिढीचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आल्याचेही दिसते. मोबाईलचा अतिरेकी वापर ही सुद्धा मोठी समस्या आहे. आपण सर्वांनी या मोबाईलच्या अतिरेकापासून स्वत:ला वाचवले पाहिजे.
विनाकारण मेसेज पुढे पाठविणे, व्हॉट्सअॅपवर तासन्तास चॅटिंग करणे खरेच गरजेचे आहे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या मोबाईलचा अतिरेक थांबविण्याची सुरुवात आपल्यापासून करुया, असे आवाहनही डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी केले.
एखादे ज्ञान किंवा चांगली उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा वापर योग्य असल्याचे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी म्हणाले की, लोकांमध्ये द्वेष, भीती पसरवणे, त्यांच्या भावना दुखावणे हा सायबर गुन्हा आहे.
समाज माध्यमांमधून लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत असले तर तो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मेसेज पूर्ण वाचून त्याविषयी खातरजमा करुनच तो पुढे गेला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी सजग असले पाहिजे.
बँकेच्या खात्याविषयी कोणी माहिती मागितल्यास ती देऊ नये. आंदोलनासारख्या परिस्थितीमध्ये वातावरण बिघडेल अशा स्वरुपाचे कोणतेही फोटो, मेसेज पुढे पाठवू नयेत. अशाप्रकारचे मेसेज पुढे पाठविल्यास यासंबंधी गुन्हा दाखल होऊ शकतो. सध्या फेक न्जूज, अफवा, तेढ निर्माण करणरे मेसेज, फेक अकाऊंट या गोष्टींविषयी कायदे आहेत. त्यामुळे या गोष्टी केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहितीही सायबर सेलचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी केले. जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर बाळ खडपकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वैयक्तिक माहिती खुली करू नये
अफवांविषयी सजग नागरिक या नात्याने आपण माहितीची खातरजमा करावी. सध्या समाज माध्यमांतून अनेक प्रकारच्या अफवा आणि खोटी माहिती पसरविली जात आहे. त्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फेक न्यूज कोणती आणि सत्य माहिती कोणती याची शहानिशा करणे गरजेचे आहे. कोणताही मेसेज पुढे पाठविताना तो वाचून त्याची खातरजमा करावी, माहितीविषयी कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तो मेसेज पुढे पाठवू नये.
त्याविषयी पोलिसांना माहिती कळवावी.
फेक अकाऊंट व अनोळखी फोन नंबर्सच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याचे अनेक गुन्हे घडत आहेत. यामुळे प्रत्येकाने योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली वैयक्तिक माहिती समाज माध्यमांच्या आधारे खुली करु नये, असे सायबर सेलचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी सांगितले.
लिंक्स ओपन करू नयेत
अनेकवेळा आपल्याला लिंक्स पाठविल्या जातात. अशा लिंक्स स्वरुपात असतात. अशा लिंक्स ओपन करून नयेत. ज्या लिंक्स सुरक्षित नसतात त्यातून तुमच्या संगणकामध्ये व्हायरस येऊ शकतो.
तसेच संगणकामधील माहितीची चोरी होण्याचीही भीती असते. बँकेकडून कोणत्याही प्रकारच्या खात्यासंबंधीची माहिती तसेच ओटीपी विचारले जात नाहीत. त्यामुळे कोणाही ओटीपी सांगू नये, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी सांगितले.