भराडीदेवी यात्रोत्सव आजपासून
By admin | Published: March 1, 2017 11:40 PM2017-03-01T23:40:54+5:302017-03-01T23:40:54+5:30
आंगणेवाडी सज्ज : लाखो भाविकांचा जनसागर उसळणार; सीसीटीव्ही कॅमेरे, चोख पोलिस बंदोबस्त
मालवण : नवसाला पावणारी अशी ख्याती पसरलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी श्रीदेवी भराडीच्या यात्रोत्सवाला आज, गुरुवार २ मार्च रोजी पहाटेपासून सुरुवात होत आहे. यात्रेला लाखो भाविकांचा जनसागर उसळणार असून, यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, या हेतूने मंडळ तसेच प्रशासनाच्यावतीने सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. सात रांगांतून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी दहा लाखांहून अधिक भाविक येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, यात्रोत्सवानिमित्त आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, चोख पोलिस बंदोबस्त, भव्य मंडप आणि मंदिर परिसरातील लक्षवेधक विद्युत रोषणाई व आकर्षक, मोहक अशी फुलांची आरास करून मंदिर सजविण्यात आलेआहे. महायात्रोत्सवाची शुक्रवारी मोड यात्रेने सांगता होणार आहे.
श्रीदेवी भराडीचा यात्रोत्सव सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आंगणे कुटुंबीय, ग्रामपंचायत मसुरे, महसूल, पोलिस प्रशासन व सर्वसंबंधित विभाग यांच्या सहकार्यातून तसेच नियोजनातून यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आंगणेवाडी परिसर दुकानांच्या गर्दीने सजला आहे. (प्रतिनिधी)
सुरक्षेसाठी शेकडो पोलिस तैनात
दरवर्षी आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांची संख्या वाढत असते. त्यानुसार याहीवर्षी गतवर्षीपेक्षाही मोठी गर्दी उसळेल, असा अंदाज आहे. व्हीआयपींची संख्याही वाढेल, हे गृहीत धरून जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, दंगा काबू पथक यांच्यासह जिल्ह्यातील ३०० महिला व पोलिस कर्मचारी तसेच रत्नागिरी व रायगड येथील १५० पोलिस कर्मचारी अशा ४५० कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.